डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सागाव भागातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या एका नराधामाला मानपाडा पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे. गेल्या चौदा दिवसांपासून आरोपी फरार होता. मानपाडा पोलिसांची विशेष पथकांनी अटकेची कारवाई केली.
प्रवीण पाटील असे अटक आरोपीचे नाव आहे. काही दिवसापूर्वी दोन अल्पवयीन मुली घराच्या परिसरात खेळत होत्या. त्यांना पाहून आरोपी प्रवीण पाटील विशिष्ट हावभाव करून अश्लिल चाळे करत होता. प्रवीण करत असलेले कृत्य पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. परिसरातील नागरिक तेथे जमा झाल्याने मारहाण होण्याच्या भीतीने प्रवीण तेथून पळून गेला. पीडित मुलींनी घरात हा प्रकार सांगितला. मुलींच्या पालकांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
हेही वाचा…ठाणे : अनाथ आश्रमातील अडीच वर्षीय मुलीला चटके, संचालक अटकेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण चोरट्या मार्गाने नाशिक जिल्ह्यात पळून गेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विशेष पथके त्याचा शोध घेत होती. तांत्रिक माहितीच्या आधारे प्रवीण सटाणा तालुक्यातील एका गावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या गाव परिसरात पाळत ठेवली होती.
प्रवीण गावात असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.त्याला कल्याण न्यायालयात पोलिसांनी हजर केल्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात विनयभंग, बलात्काराचे प्रकार वाढल्याने शासनाने या भागात कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.