कुळगाव-बदलापूर पालिका हद्दीतील  आदिवासी पाडय़ांवर सुविधांची वानवा
कुळगांव-बदलापूर नगरपालिका हद्दीत असलेल्या आदिवासी वस्त्या व पाडय़ांवर पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, रस्ते अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासींनी या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात या मागणीसाठी श्रमजिवी संघटनेच्या वतीने बदलापूर पालिका कार्यालयावर अलीकडेच बिऱ्हाड मोर्चा काढला होता. या वेळी आदिवासी महिला व पुरुषांनी लाकडांच्या मोळीसह या मोर्चात सहभागी होऊन पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कुळगांव-बदलापूर ही सात-आठ महसुली गावांची एकत्रित नगरपालिका १९९२ मध्ये अस्तित्वात आली. या वेळी या गावांलगत असलेले काही आदिवासी पाडे व वस्त्याही पालिकेत समाविष्ट झाल्या आहेत. यात कात्रप डोंगरशेत पाडा, माणकिवली, दंडाची वाडी, ठाकूरपाडा, सोनिवली, मोहपाडा आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष असून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, रस्ते आणि रस्त्यावर विजेची सोय करणे, आदिवासी बांधवांच्या झोपडी व घरांना त्वरित घरपट्टी आकारणी करणे, पाडय़ांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे भरवणे या आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालिका कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. मात्र मोर्चा पालिकेच्या कार्यालयापाशी पोहोचताच पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने मोर्चेकरी नाराज झाले होते. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.
या वेळी आदिवासींच्या विविध मागण्यांसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबद्दल श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यातच मुख्याधिकारी देविदास पवार कार्यालयात नसल्याचे समजल्यावर मुख्याधिकारी येणार नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र प्रशासन अधिकारी जितेंद्र गोसावी यांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून त्यांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत बदलापूर पालिका हद्दीतील आदिवासी वाडय़ा-पाडय़ांना पिण्याचे पाणी व विजेचा प्रश्न दोन महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणच्या अधिकाऱ्यांची एक बैठक येत्या १२ जानेवारीला आयोजित करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या वेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.