ठाणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू केलेल्या शाखा संपर्क अभियानात रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांसह शहर आणि उपनगरात रखडलेले झोपडपट्टी तसेच म्हाडाचे पुर्नविकास प्रकल्प, संक्रमण शिबीरातील रहिवाशांचे होणारे हाल, क्लस्टर योजनेतील अडथळे यासारख्या मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात या संपर्क अभियानाची व्याप्ती ठरवून वाढवली जात आहे. या अभियानाचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरात क्लस्टर पायाभरणीचा मोठा सोहळा घडवून आणताना मुंबई तसेच आसपासच्या शहरांमध्ये पुर्नविकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो रहिवाशांमध्ये मतांची पेरणी करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जात आहे.

गेल्या आठवडाभरात सुरू झालेल्या या अभियानात खासदार शिंदे यांचे उपनगरातील काही विशिष्ट भागात हे दौरे ठरविण्यात आले होते. मुंबईत म्हाडा तसेच झोपडपट्टी पुर्नविकास योजनेत अनेक प्रकल्पांची वर्षानुवर्षे रखडपट्टी सुरू आहेत. यापैकी काही प्रकल्पातील संक्रमण शिबिरांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा काही संक्रमण शिबिरांना भेटी देत खासदार शिंदे यांच्या समवेत रखडलेल्या प्रकल्पातील नागरिकांच्या बैठका घडविण्यात आल्या. यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांची भेट तसेच राज्य सरकारमधील विशिष्ट विभागांकडे हे प्रश्न या दौऱ्याच्या निमित्ताने पाठविले जात आहे. मुंबईत पुर्नविकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका मोठ्या मतदार समुहापर्यंत पोहोचण्याचा पद्धतशीर प्रयत्न यानिमीत्ताने केला जात असून, यासाठी ठाण्यातील पुर्नविकास प्रकल्पांचे दाखलेही दिले जात आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – धुळ्यातील रस्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या श्रेय वादात स्थानिकांना मनस्ताप

ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची खेळी

शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडले. काही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील ठाकरे गटाचे वर्चस्व मोडून काढण्यात आले. मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, कल्याण, डोंबिवली नवी मुंबई या मोठ्या शहरांमध्ये शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असली तरी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला अद्याप तितकासा धक्का देण्यात शिंदे यांना यश आलेले नाही. मुंबई महापालिकेतील डझनभर माजी नगरसेवकांनी आतापर्यत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अजूनही ठाकरेंची मुंबईत मोठी ताकद आहे. या ताकदीला धक्का देण्यासाठी शिंदे यांनी आता मुंबईत शिवसेना शाखा संपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे या अभियानाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, मुंबईतील विविध शाखांना भेट देत त्या भागातील समस्या जाणून घेत आपल्या पक्षाची ताकद वाढवणे हाच या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रभाव आहे त्या उपनगरांमध्ये ठरवून हे दौरे आयोजित केले जात असून, यानिमीत्ताने खासदार शिंदे यांनी मुंबईतील प्रलंबित प्रश्नांवर जाहीर चर्चा सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अपयश दाखवून त्यांना उघडे पाडण्याची ही खेळी असल्याचे समजते.

संक्रमण शिबीर आणि रहिवाशांच्या भेटीगाठी

खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या दुसऱ्याच दौऱ्यात वांद्रे येथील खार गोळीबार परिसरातील शिवालीक व्हेंचर या गृहसंकुलाच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिराला भेट दिली. शेकडो कुटुंब १४ वर्षांपासून येथे राहत असल्याचा आरोप करत डॉ. शिंदे यांनी संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची घोषणा केली. मुंबई महापालिका क्षेत्रात असे असंख्य पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांची संथगती, संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे हाल, त्यांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा या प्रश्नांवर बोट ठेवत आता शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार शिंदे यांनी गेल्या चार भेटींमध्ये याच प्रश्नांचा पुनरुच्चार केल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा – खासदार राघव चड्ढा यांना चुकून दिला मोठा बंगला; आता चड्ढा यांना घराबाहेर काढण्यासाठी राज्यसभा सचिवालयाची न्यायालयात धाव

म्हाडा, संक्रमण शिबीर, पुनर्विकास प्रकल्प अशा प्रश्नांतून शिवसेनेने मुंबईत आपली पाळेमुळे खोलवर रूजवली होती. मराठी माणूस मुंबईत रहावा यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचा प्रचार खुद्द ठाकरेंनी वेळोवेळी केला आहे. म्हाडा, एसआरए यासारख्या प्रकल्पांवर मुंबईतील काही ठराविक राजकीय नेत्यांचा वर्षानुवर्षे प्रभाव राहिल्याचे पहायला मिळते. या प्रभाव क्षेत्रात हात घालण्याचा प्रयत्न आता शिंदेंकडून सुरू झाल्याचे या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे.

रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, इमारत पुनर्विकास प्रकल्पांतून मुंबईतील काही ठराविक कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे प्रयत्नही सुरू झाल्याची चर्चा आहे. नुकताच ठाण्यात क्लस्टर योजनेची पायाभरणी करून पुर्नविकासाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात मतांची पेरणी करण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे. नुकतीच दिव्यात जाहीर सभा घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महानगर प्रदेशात १० लाख घरांची पायाभरणी केली जाईल, अशी घोषणा केली. मुंबई महानगरातील धोकादायक, अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. या घरांच्या स्वप्नाला बळ देऊन शिंदे स्वतःची ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

Story img Loader