सकाळी चालणे हे काही आता केवळ हौसेमौजेचे किंवा वेळ घालविण्याचे कारण उरलेले नाही. त्याचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने अनेक सूर्यवंशीही पहाटेच घराबाहेर पडून नियमित चालू लागले आहेत. विविध आजारांमध्ये डॉक्टर्स औषधे आणि पथ्यपाण्याबरोबरीनेच नियमित चालण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. त्यामुळे हल्ली उद्यानांमध्ये सकाळी ‘वॉक’साठी येणाऱ्यांची गर्दी दिसते. प्रभातकाळी ‘वॉक’साठी बाहेर पडणाऱ्यांमध्ये आता  वैविध्यही दिसून येते. कुठे तरुण मंडळी धावण्याचा व्यायाम करताना दिसतात, तर कुठे कुणी योगमुद्रेत तल्लीन होतो, वयोवृद्ध मंडळींसाठी ‘मॉर्निग वॉक’नंतरचा गप्पांचा कट्टा अधिक सुखावह असतो. ठाण्यात अलिकडे अनेक ‘ओपन जिम’ सुरू झाल्या आहेत. त्याचाही फायदा अनेक ज्येष्ठ नागरिक घेतात. अनेक ठिकाणी सकाळी लाफ्टर क्लब, सामूहिक व्यायाम असे उपक्रमही राबवण्यात येतात.