motherhood pride thane tembhi naka navratri festival cm eknath shinde | Loksatta

मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे महापालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’ अभियान राबविण्यात येणार आहे.

मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : घरातील एक माता सशक्त असेल तर संपूर्ण घर सुरक्षित असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे सशक्त असणे गरजेचे आहे, मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाण्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले.टेंभीनाका येथे आयोजित केलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ठाणे महापालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर दहा दिवस राबविण्यात येणार आहे.

टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोगय विभागाच्यावतीने हे शिबिर आयोजित केले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व महिला भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी देवी मंडपात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. महिला पोलीस या संपूर्ण समाजाचे रक्षण करीत असून समाजाबरोबर घर सुरक्षित ठेवण्याचे कामही त्या करीत आहे.

हेही वाचा : मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात

हे अभियान महिलांसाठी असल्यामुळे त्याचे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते केले असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या या संपूर्ण यंत्रणेचे कौतुक मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. या उद्घाटनप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त मनीष जोशी, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव, वैदयकीय आरोगय अधिकारी डॉ. राणी शिंदे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपाराची नोटीस

टेंभी नाका येथील शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्याशिवाय, महिलांची बीएमआय, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, मॅमोग्राफी, एक्स रे, ईसीजी यासारख्या तपासण्या विनामुल्य केल्या जाणार आहेत. तसेच, रुग्णाच्या आवश्यकतेनुसार महापालिकेच्या रुग्णालयात संदर्भ सेवा देऊन पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी , प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महिलांना व बालकांना फोलीक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न अशी आवश्यकतेनूसार औषधेही देण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 11:05 IST
Next Story
मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात