वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त लगबग सुरू आहे. सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. गोड फराळाचे वाटप करण्यात येत आहे. आश्रम अगदी उजळून गेला आहे. पण आश्रमातल्या ओटय़ावरून अनेक डोळे दूरच्या अंधाराकडे टक लावून बसले आहेत.. दिवाळीच्या निमित्ताने आपली मुले आपल्याला न्यायला येतील, अशी आस लावून आश्रमातील वृद्ध माता त्यांची वाट पाहत आहेत. गेल्या आठवडय़ाभरापासूनची श्रद्धानंद वृद्धाश्रमातील आश्रित मातांची ही प्रतीक्षा दिवाळीचा पहिला दिवस संपत आल्यानंतरही संपलेली नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करून वाढवलेल्या मुलांनी वृद्धाश्रमात आणून सोडले तेव्हाही फार दु:ख वाटले नाही. पण सणाच्या आनंदातही त्यांना आपली आठवण होत नाही, याची खंत या मातांचे अंत:करण पोखरून टाकत आहे.
वसईच्या श्रद्धानंद महिला वृद्धाश्रमात ७० हून अधिक वृद्ध महिला वास्तव्याला आहेत. ६० वर्षांवरील वृद्ध महिलांना या आश्रमात प्रवेश दिला जातो. गेल्या ५० वर्षांपासून आश्रम व्यवस्थापन अशा वृद्ध महिलांची मनोभावे सेवा करते. आश्रमातील अनेक महिला सुखवस्तू घरातल्या आहेत. काहींची मुले परदेशात असल्याने त्यांना येथे येऊन राहावे लागले. तर काहींना त्यांच्या मुलांनी घरात अडचण नको, म्हणून येथे आणून सोडले. आपली कमाई आणि कष्ट ज्या मुलांच्या उत्कर्षांसाठी पणाला लावले, त्याच मुलांकडून अवहेलना झाल्यानंतरही या वृद्ध मातांच्या मनातील मुलांबद्दलची माया अजिबात आटलेली नाही.
दिवाळी किंवा अन्य सणांच्या दिवसांत यातील काही महिलांची मुले त्यांना भेटायला येतात, काही दिवस घरीदेखील नेतात. आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करण्याचा तो आनंद या मातांसाठी पुढच्या वर्षीपर्यंत पुरत असतो. पण बहुतांश महिलांच्या नशिबी हा आनंदही नाही. ‘आपली मुले-मुली आपल्याला न्यायला येतील, नातवंडांचे तोंड पाहता येईल’ अशी कल्पना करीत मुलांची वाट पाहत बसलेल्या या वृद्ध मातांच्या पदरी यंदाही निराशा आली आहे.
‘आजपासून दिवाळी सुरू झाली. माझा मुलगा येईल असं वाटत होतं. पण तो आला नाही. त्याने यायला हवं होतं,’ असं पाणावलेल्या डोळ्यांनी एका वृद्ध महिलेने सांगितले. ‘काहींची मुले फोनवर विचारपूस करतात, तर काही जणींना त्यांच्या मुलांनी नेले आहे. त्यामुळे आपलाही मुलगा येईल ही त्यांची आशा अजून प्रबळ होते. माझ्याकडे फोन नाही. मला कुणीच फोन करीत नाही,’ असे अन्य एका वृद्ध महिलेने सांगितले.
‘आमच्या आश्रमात असलेल्या काही महिलांचे कुणीच जवळचे नातेवाईक नाहीत; परंतु उर्वरित महिला या सुखवस्तू घरांतील आहेत. त्यांची मुले नियमित पैसे पाठवतात. कधी फोनवर विचारपूस करतात, पण भेटायला क्वचितच येतात,’ असे सरचिटणीस जगदीश शेट्टी यांनी सांगितले. सणाला मुलांसमवेत असावे अशी प्रत्येक आईची इच्छा असतेच, त्यांनी यायला हवे असेही ते म्हणाले. आश्रमाच्या अधीक्षिका अनामिका आणि वैशाली मोहिते, ज्योती सकपाळ या वृद्ध महिलांची मनोभावे सेवा करतात. त्यांना आम्ही सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे आश्रमाच्या समितीचे सदस्य संतोष वळवईकर यांनी सांगितले.