ठाणे : बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखविण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. खिचडी आणि करोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आणखी काही लोक जाणार आहे. त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार असल्याचीही टीकाही त्यांनी केली.

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी युवासेना राज्यस्तरीय मेळाव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली. प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा >>>ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून फिरत असून त्याची काही लोकांना एलर्जी होत आहे. पण, मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते म्हणून हेलिकॉप्टर प्रवास टीका होत नव्हती, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आधी काही लोक गाडी स्वतः चालवत पंढरपूरला जात होते पण, इतक्या वेळात किती फाईलवर सह्या झाल्या असत्या, अशी टीकाही त्यांनी केली.

पूर्वी उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावले जायचे, असे केले तर रोजगार कसा निर्माण होणार होता, असा प्रश्न उपस्थित करत आता दावोसमध्ये केलेल्या करारामुळे दोन लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  दावोसला काही लोक कश्मीरसारखे फिरायला जायचे आणि सोबत इतरांना घेऊन जायचे. आता तिथे जाऊ शकत नाही आणि आपल्या ऐवजी दुसरा जातोय त्याचे त्यांना दुःख आहेत, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही स्वतःच्या पैशाने दावोसला गेलो, त्यांच्यासारखे सरकारच्या पैशाने गेलो नव्हतो आणि नातेवाईकांना नेले नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.  राजकारणात अपघाताने आलो, पक्षाला गरज होती म्हणून राजकारणात आलो. कल्याण लोकसभा निवडणूक लढली आणि ती जिंकली, असेही ते म्हणाले. गेल्यावेळेस एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या, परंतु आता राजा का बेटा राजा नहीं होगा जो मेहनत करेंगा और कबिल होगा वही राजा होगा, असेही ते म्हणाले.