ठाणे : महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही, असा आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. तसेच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली. वीस वर्षांपूर्वी मी काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते पण, ते आलेच नाहीत. त्यांना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोप खासदार देवरा यांनी केली.

हेही वाचा >>>डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, प्रीमिअर मैदानातील बालाजी महोत्सवासाठी वाहतूक विभागाचा निर्णय

तरुण वर्ग म्हणजे देशाचे भविष्य आहे. तरुण वर्गाकडे खूप वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे व्हिजन हवे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक त्यांचा प्रवास आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील हिंदू सणांना, रूढी व परंपरेला प्रोत्साहन दिले आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली नाही म्हणून त्यांनी आपली विचारधारा बदलली. याला खऱ्या अर्थाने संधीसाधूपणा म्हणतात. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण यांनी नाकारले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आस्थेला नाकारले, अशी टीकाही त्यांनी केली.