ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन फलाट क्रमांक २,३ आणि ४ वरची फलाटाची लांबी वाढविण्याची मागणी वारंवार होत होती. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाकडून फलाट लांबीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम प्रगतीपथावर असून येत्या ३१ डिसेंबर पासून या तीनही फलाटांवर १५ डब्यांची लोकल थांबणार असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
या फलाटांची लांबी वाढविल्याने तीन अतिरिक्त डब्यांतून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचेही खासदार म्हस्के यांनी सांगितले. खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवरी रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विविध विकासकामांचा आढावा घेतला.
फलाटांची लांबणी वाढविणे, फलाट क्रमांक ५ आणि ६ वर एक्सलेटर बसविण्याचे काम, पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साठू नये यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकल्या जात आहेत, अशी विविध विकास कामे सुरु असून त्याची पाहणी करण्यासाठी सोमवारी खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौरा केला. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन खासदार म्हस्के यांनी फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्या कामाला मंजूरी मिळाली असून हे काम प्रगतीपथावर आहे. हे काम १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार असून ३१ डिसेंबरपासून या तिनही फलाटांवर १५ डब्यांची लोकल थांबणार आहे. लांबी वाढविल्याने ३ अतिरिक्त डब्यांतून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
ठाणे स्थानकात स्वयंचलित जिन्यांची संख्या वाढणार फलाट क्रमांक ५ आणि ६ वर स्वयंचलित जिना बसविण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत चार नवीन स्वयंचलित जिने बसविण्यात आले आहेत. तर, एका स्वयंचलित जिन्याचे काम प्रलंबित असल्यामुळे खासदार म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. फलाटावर स्वयंचलित जिन्यास अडथळा ठरणारे मंदिर स्थलांतरित करून काम तीन दिवसात सुरु करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तर, फलाट क्रमांक ७, ८, ९ आणि १० वर देखील स्वयंचलित जिने बसविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस मधून येणाऱ्या वयोवृध्द, लहान मुले, महिलांना सोयीचे होईल. स्वच्छतागृहांसाठी डीमार्टशी करार करण्यात आला असून खासदार नरेश म्हस्के यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छ, निगा, देखभाल बाबत सूचना केल्या.
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साठू नये यासाठी उपाययोजना पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साठते आणि लोकलचा वेग मंदावतो. यासाठी ‘मायक्रोटेक’द्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.
