ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांसोबत स्नेहभोजन आयोजित केला होता. या स्नेहभोजनास खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या स्नेहभोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या बालपणाचे आणि इतर किस्से ऐकून शिंदे हे अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले. त्याबाबतची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसाठी गुरुवारी सायंकाळी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याबाबतचे छायाचित्र मोदी यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केले आहे. त्यामध्ये मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, शिंदे गटाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे दिसत आहेत. या स्नेहभोजनानंतर शिंदे यांनी मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ही पोस्ट शेअर केली.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे
७, लोककल्याण मार्ग येथे आपल्या सोबत जवळपास दीड तास घालवण्याची संधी मिळाली. याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. ही भेट फक्त आणखी एक राजकीय बैठक ठरू शकली असती, पण तिचे रूपांतर माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवात झाले. दिल्लीची थंड हवा त्या दिवशी वेगळीच उबदार वाटत होती. आपण आपल्या बालपणीच्या संघर्षांच्या कथा सांगितल्या. नेतृत्वाबद्दलचे विचार मांडले आणि सार्वजनिक जीवनातील दशकांच्या अनुभवाने शिकवलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. मला अजूनही आठवते, मी विचारलं होतं, “आपण एवढा ताण कसा सांभाळता?” तेव्हा आपण अगदी शांतपणे दिलेले उत्तर आजही माझ्या मनात कोरले आहे.
“तुमचा हेतू स्पष्ट असेल, तर ताण नाहीसा होतो.” झोप, ऊर्जा आणि फोकसबद्दल दिलेलं मार्गदर्शनही तेवढंच प्रेरणादायी होते असे शिंदे म्हणाले. फक्त साडेतीन तासांच्या झोपेवर आपण इतका प्रचंड कामाचा ताण आणि वेळापत्रक सांभाळता आणि त्यातही झोपेची गुणवत्ता प्रमाणापेक्षा महत्त्वाची असल्याचं सांगितले हे ऐकून खोलवर प्रभाव पडला.
राग नियंत्रित करण्याची आपण सांगितलेली पद्धत प्रत्येक भावना कागदावर उतरवून मग त्या भावना मनातून सोडून देणे ही आत्मनियंत्रणाची शिकवण मी कधीही विसरणार नाही. आपल्या साध्या-सोप्या कथा देखील प्रचंड प्रेरणादायी होत्या. आपली हिंदी इतकी परिष्कृत कशी झाली, असा प्रश्न विचारला असता, मेहसाणा रेल्वे स्थानकावर गुराख्यांकडून शिकलेला अनुभव आपण सांगितला, जो अत्यंत नम्र, जीवनाधारित आणि मनाला स्पर्श करणारा होता.
त्यातून शिकायला मिळाले की खरे शिक्षण जीवनातूनच मिळते, आपण दिलेली पुस्तकाची शिफारस बेंजामिन फ्रँकलिन यांची चरित्रकथा हा केवळ एक सल्ला नव्हता तर आयुष्य आणि नेतृत्वासाठी दिलेलं एक मौल्यवान मार्गदर्शन होते असेही ते म्हणाले. मोदीजी, आपण शिकवलं की नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार नव्हे, तर हेतूची स्पष्टता, सहानुभूती आणि मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची शक्ती.आपल्या कथा, मार्गदर्शन आणि शांत, उबदार उपस्थितीनं माझ्यावर अमिट छाप सोडली आहे. 7, लोककल्याण मार्गातून बाहेर पडताना मनात एक वेगळीच शांतता, स्पष्टता आणि प्रेरणा घेऊन आलो. जी माझ्या आगामी जबाबदाऱ्यांना दिशा देत राहील असेही ते पोस्टमध्ये म्हणाले.
