भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत सर्वात जास्त वीज गळती असलेल्या मुंब्रा, दिवा परिसरात महावितरणने टाकलेल्या धाडीत ४५ वीजचोऱ्या पकडण्यात ठाणे मंडळाच्या पथकाला यश आले आहे. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य अभियंता सतीश करपे यांनी विविध पथके तयार करून वीजचोरी पकडण्याचे धाडसत्र सुरू केले आहे. बुधवारी  मुंब्रा उपविभागाच्या साहाय्याने विशेष मोहीम राबवली. यामध्ये ४५ वीज ग्राहकांवरती विद्युत कायद्यानुसार अंदाजे २ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पाच दिवसांपुर्वीच मुंब्रा उपविभागाच्या वीजचोरीविरोधी पथकाने टाकलेल्या धाडीत सय्यद युसूफ आणि रमेश पाटील या वीज ग्राहकाने ७३३१ युनिट वीज चोरून वापरल्याचे निदर्शनास आले होते. ही वीजचोरी १ लाख ५ हजार ९२७ रुपयांची होती. यापूर्वी डिसेंबरमध्ये ३२ लाख ४२ हजार रुपयांच्या २०५ वीज चोऱ्या शोधून काढल्या होत्या.

ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या धाडीत कार्यकारी अभियंता नेमाडे, दिलीप खानंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुहास बेडगकर, साहाय्यक अभियंता पाटील, हकीम, लबाडे, शेलार तसेच जनमित्र पांडे, पवार व गोसावी यांनी सहभाग घेतला होता.

बुधवारी राबविलेल्या वीजचोरी शोधमोहिमेसोबतच वीज बिल वसुली मोहिमेत ७१ वीज ग्राहकांकडून १० लाख २ हजार रुपये वसूल करण्यात आले. तर वीज देयक न भरल्यामुळे १४ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.