डोबिंवली: शिळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी|msrdc refusal to put a road in shil road bifurcation discontent among citizens dombivali | Loksatta

डोबिंवली: शीळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी

शिळ फाटा रस्त्यावर मारुती सुझुकी शोरुम जवळ भूमी लाॅन्स हे ३०० रहिवाशांचे वस्ती असलेले गृहसंकुल आहे.

डोबिंवली: शीळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी
डोबिंवली: शिळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील ३०० रहिवाशांची वस्ती असलेल्या भूमी लाॅन्स गृहसंकुलाच्या प्रवेशव्दारावरील रस्त्यावर दुभाजकाच्या जागेतून सोसायटीतील रहिवाशांना वाहन जाईल एवढा रस्ता ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने नाकारल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शीळ रस्त्यावरील गृहसंकुले, पेट्रोप पंप, शाळा, बंगला, ढाबा, हाॅटेल समोरील रस्त्यावर दुभाजकांमध्ये अंतर ठेऊन वाहन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मग, भूमी लाॅन्स गृहसंकुलातील रहिवाशांवर अन्याय का केला जात आहे, असे संतप्त प्रश्न रहिवाशांकडून केले जात आहेत.

शिळ फाटा रस्त्यावर मारुती सुझुकी शोरुम जवळ भूमी लाॅन्स हे ३०० रहिवाशांचे वस्ती असलेले गृहसंकुल आहे. या संकुलातील बहुतांशी वर्ग नोकरदार, व्यावसायिक आहे. प्रत्येकाची एक ते दोन दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. या संकुलातील बहुतांशी मुले डोंबिवली, ठाणे, कल्याण परिसरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. शाळेच्या बस त्यांना घेण्यासाठी येतात. सकाळच्या वेळेत वाहनधारकांना भूमी लाॅन्स सोसायटी समोरील दुभाजका मधील रस्ता ओलांडून वाहनाला सहज शिळफाटा दिशेने जाता यावे यासाठी भूमी लाॅन्स समोरील १० फुटाच्या जागेत सिमेंटचे ठोकळे लावू नयेत म्हणून रहिवासी गेल्या महिन्यापासून ठेकेदार, एमएसआरडीसी, वाहतूक अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. येथील रहिवाशांच्या मागणीची कोणीही दखल घेत नाही. भूमी लाॅन्स समोर रस्ता ठेवला नाही तर रहिवाशांना ५०० मीटर पुढे जाऊन शीळ रस्त्यावरील टोयोटा सर्व्हिस सेंटर जवळून वळण घेऊन मग शीळ फाटा दिशेकडे वाहन घेऊन जावे लागेल. हे वळण घेताना मुख्य रस्त्यावर वाहन कोंडी होण्याची शक्यता आहे. याची जाणीव वाहतूक अधिकारी, ठेकेदार, एमएसआरडीसी अधिकारी यांना करुन देऊनही अधिकारी त्याची दखल घेत नाहीत, अशा तक्रारी भूमी लाॅन्समधील रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

भूमी लाॅन्स समोरील रस्त्यावर दुभाजक लावण्याची कामे ठेकेदाराकडून सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्या पूर्वीच वाहनाच्या वाहतुकीसाठी जागा ठेवणे आवश्यक आहे. सकाळ ते संध्याकाळच्या वेळेत भूमी लाॅन्स मधील अनेक मुले परिसरातील शाळांमध्ये शालेय बस मधून प्रवास करतात. भूमी लाॅन्स समोरील रस्त्यावरुन रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याची दुभाजकामुळे सोय नाही. दुभाजक तीन फूट उंचीचे असल्याने त्यावर चढून ओलांडणे पालकांना शक्य होणार नाही. अशावेळी रस्त्या पलीकडे शालेय बसमधून उतरलेल्या मुलांना टोयोटा सर्व्हिस सेंटरपर्यंत मागे नेऊन तेथून रस्ता ओलांडून मग घरी आणावे लागणार आहे. असे रोज करणे शक्य नाही, अशा तक्रारी पालकांनी केल्या.

हेही वाचा: डोंबिवली: मोठागाव ते काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन रखडले?

खासगी वाहन, बसने भूमी लाॅन्समधील रहिवाशाला ठाणे, नवी मुंबईकडे जायाचे असेल तर त्यांना ५०० मीटर चालून रस्ता ओलांडून मग वाहन पकडणे शक्य होणार आहे. शिळफाटा रस्त्यावरील प्रत्येक हाॅटेल, ढाबा, गृहसंकुल, पेट्रोल पंपा समोर ठेकेदाराने रस्ता दुभाजकांमध्ये वाहन जाईल एवढे अंतर ठेऊन मग काम केले आहे. ती काळजी भूमी लाॅन्स गृहसंकुला समोर का घेतली जात नाही. ठेकेदार याविषयी वरिष्ठांचे लेखी आदेश आणा मग काम करतो असे सांगतो. तोही आता संपर्काला प्रतिसाद देत नाही. या रस्त्याचे एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन बोरुले यांनाही रहिवाशांनी संपर्क केला. तेही बघू, करू अशी उत्तरे देत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. राजकीय मंडळीही या महत्वपूर्ण विषयात लक्ष देत नसल्याने रहिवाशांना हिरमोड झाला आहे. ठेकेदार, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 13:22 IST
Next Story
डोंबिवली: मोठागाव ते काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन रखडले?