ठाणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज बनवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात आधुनिक ‘प्रवासी निवारे’ उभारण्यास शासनाने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे, मानपाडा, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांसारख्या महत्वाच्या एसटीच्या मार्गावर हे अत्याधुनिक प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा हा मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचा आणि वेगाने विकसित होणारा भाग असल्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांना जोडणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) विस्तृत जाळे कार्यरत असून, दररोज हजारो प्रवासी या सेवेचा नियमित वापर करतात. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांसारख्या भागांतून जिल्ह्याच्या विविध कोपऱ्यांत तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांकडे एसटी बससेवा मोठ्या प्रमाणावर धावते. याशिवाय, नाशिक, पुणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने एसटी बस ठाणे जिल्ह्यात ये-जा करत असतात, त्यामुळे बसस्थानकांवर आणि प्रमुख थांब्यांवर प्रवाशांची सतत वर्दळ असते.
अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज थांबा मिळणे अत्यंत आवश्यक ठरते. अनेक ठिकाणी सध्या प्रवासी उभे राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे उन्हाळा, पावसाळा किंवा इतर प्रतिकूल हवामानात प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी थांबणाऱ्या प्रवाशांसाठी ही समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे आधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘प्रवासी निवारे’ उभारण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रत्येक प्रवासी निवाऱ्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या कामांमध्ये निवाऱ्याची बांधणी, पायाभूत सुविधा, वीज व पाणीपुरवठा, तसेच पूरक विकासकामांचा समावेश आहे. तर या प्रवासी निवाऱ्यांचे काम सुरू करण्यापूर्वी वास्तुशास्त्रीय व तांत्रिक मान्यता घेणे, पर्यावरणीय नियमांचे पालन करणे तसेच सविस्तर अंदाजपत्रकानुसार कामे राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासी निवारे म्हणजे काय ?
प्रवासी निवारे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसथांब्यांवर किंवा प्रमुख मार्गांवर उभारण्यात येणारी अशी संरचना, जिथे प्रवाशांना बसची वाट पाहताना सुरक्षित, आरामदायी आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आधुनिक प्रवासी निवाऱ्यांमध्ये केवळ छप्पर आणि बसण्याची सोय एवढ्यापुरते मर्यादित न राहता, विविध अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. यामध्ये आरामदायी आसनव्यवस्था, पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण देणारी मजबूत रचना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना, बस वेळापत्रक व मार्गांची माहिती देणारे फलक, डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच स्वच्छतेची सोय यांचा समावेश असतो. काही ठिकाणी दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश (रॅम्प) आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात येतात. पारंपरिक बस थांब्यांपेक्षा ही सुविधा अधिक सुरक्षित व आरामदायी मानली जाते.
जिल्ह्यात कुठे प्रवासी निवारे ?
ठाणे विभागात एकूण १५ ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात येणार असून, त्यामध्ये हॉटेल फाउंटन, अंबाडी, डोळखांब, खांडेश्वरी नाका, किन्हवली, कुडूस, माजिवडा (भिवंडीकडे), माजिवडा ( बोरिवलीकडे ) मामनोली, मानपाडा, रांजणोली, सरळगाव, शेणवा, टोकावडे आणि माणकोली या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसटी प्रवाशांची वर्दळ असल्याने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
