MSRTC Bus Fare Hike Konkan Summer 2026: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा प्रवास महाग ठरणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत ‘परिवर्तनशील भाडे’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात १० टक्के प्रवासी तिकीट दरवाढ केली आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या काळात गावाकडे आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे
उन्हाळ्यात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या गर्दीमुळे बससेवेवर ताण येत असल्याने महसूल वाढवणे आणि सेवा सुरळीत ठेवणे या उद्देशाने एसटीने ही दरवाढ लागू केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ प्रामुख्याने साध्या बस सेवांसाठी असून निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, विना वातानुकूलित शयनयान, शिवशाही (वातानुकूलित), जनशिवनेरी (वातानुकूलित), शिवनेरी (वातानुकूलित), ९ मीटर ई-बस (वातानुकूलित), १२ मीटर ई-बस/ई-शिवाई, या बससेवा प्रकारातील बस भाड्यात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.
दरवाढीमुळे कोकणातील अनेक मार्गांवरील प्रवास खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरी – मुंबई प्रवास सुमारे ६२ रुपयांनी, बोरिवली मार्गे ६५ रुपयांनी, तर पुणे प्रवास ५७ रुपयांनी महागला आहे. तसेच लांजा- मुंबई, गुहागर- मुंबई, दापोली- मुंबई यांसारख्या मार्गांवरही ४० ते ६५ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. परिणामी, मामाच्या गावाला जाण्याचा पारंपरिक उन्हाळी प्रवास यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे.
याशिवाय, काही ठिकाणी प्रत्येक तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार असून त्यातून बस व बसस्थानकांची स्वच्छता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासधारकांना या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.
एसटीने सर्व आगार आणि विभागीय अधिकाऱ्यांना या भाडेवाढीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, ईटीएम आणि ओआरएस प्रणालीद्वारे सुधारित भाडे आकारणी केली जाणार आहे. ज्या मार्गावर निश्चित भाडे पद्धती लागू आहे. त्या ठिकाणीही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे काही प्रवाशांनी मान्य केले आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा आर्थिक ताण वाढणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
