ठाणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकाक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसाठी करण्यात आलेल्या भरावामुळे दिव्यातील नैसर्गिक नाले आणि पाण्याचे प्रवाह बुजल्याने पावसाळ्यात दिवा बुडण्याचा धोका निर्माण झाल्याची भिती शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. तसेच कोट्यवधींच्या बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जात असले तरी तेथे जाण्यासाठी पुरेसे रस्ते आणि वाहतूक व्यवस्था नसल्याचा दावा करत त्यांनी प्रकल्पाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिवा परिसरातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, देसाई, शिळ आणि पडले परिसरात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येत आहे. मात्र, प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांवर अन्याय होत असून, दुसरीकडे अनियोजित भरावामुळे दिव्यातील नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. बुलेट ट्रेनसाठी बेतवडे परिसरात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून पावसाचे पाणी वाहून जाणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी भराव करण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नाला किंवा ड्रेनेज व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच देसाई खाडी, म्हातार्डी आणि बेतवडे परिसरातील नैसर्गिक नाले व पाण्याचे प्रवाह बुजवण्यात आले असून त्यामुळे पावसाचे पाणी साचून शेतकऱ्यांना शेती करता आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिव्यातील नागरिकांनी यापूर्वी रेल्वे, दिवा-वसई, दिवा-पनवेल, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि रस्त्यांसाठी जमिनी दिल्या आहेत. आता बुलेट ट्रेनसाठीही जमीन जात असताना भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. बुलेट ट्रेन स्थानक परिसरात स्थानिकांसाठी व्यावसायिक गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मढवी यांनी केली. देसाई, आगासन आणि म्हातार्डी परिसरातील कांदळवनाच्या नुकसानीचा आरोप करत, पर्यावरणाची हानी झाली असल्यास स्थानिक पातळीवरच कांदळवनाची पुनर्लागवड करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुसळधार पावसामुळे बुलेट ट्रेनच्या कामासाठी उभारलेले बांधकाम वाहून गेले असून, पाण्यात पडलेले बांधकाम साहित्य हटवण्यात आले नसल्यामुळे होडीने प्रवास करणाऱ्या आणि मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोपही मढवी यांनी केला. बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध नसून, प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या स्थानिकांना न्याय मिळावा, ही भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भूसंपादन, नुकसानभरपाई, पाण्याचा निचरा, रस्ते, पर्यावरण आणि पुनर्वसन या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका, बुलेट ट्रेन प्राधिकरण आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन ग्रामस्थांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा. यासाठी ठाणे महापालिकेने ऐतिहासिक ठराव करावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमाकांत मढवी, साक्षी मढवी, अर्चना पाटील आणि दर्शना म्हात्रे यांच्यासह दिव्यातील इतर नगरसेवकांनी सभेत केली.

पुराचा धोका

बेतवडे गावात अनेक वर्षांपासून नागरिक राहत असलेल्या घरांच्या उंचीपर्यंत भराव करण्यात आला आहे. भविष्यात २६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास या घरांना आणि नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामासोबतच पाण्याचा निचरा आणि पूरप्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

रस्तेच नाहीत

बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार असले तरी त्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक रस्ते आणि वाहतूक व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही. बुलेट ट्रेनच्या बाजूला असलेल्या शेतजमिनींमध्ये जाण्यासाठी पुरेसे रस्ते ठेवण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी केवळ तीन फुटांचे रस्ते ठेवण्यात आले असून, त्यावरून बैलगाडी, रिक्षा किंवा दुचाकी कशी जाणार, असा प्रश्न मढवी यांनी उपस्थित केला. दिव्यात सुमारे सहा लाख नागरिक राहत असताना सध्याची मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था अपुरी आहे. अशा परिस्थितीत बुलेट ट्रेन स्थानकावर प्रवासी येणार कसे, असा प्रश्न मढवी यांनी उपस्थित केला. बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी पार्किंगची जागा हवी असल्यास ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली घरे तोडण्याऐवजी बुलेट ट्रेन प्राधिकरणाने खासगी जमीन खरेदी करावी, असेही ते म्हणाले. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील दातिवली रेल्वे स्थानकाचा विकास करून बुलेट ट्रेन स्थानकाशी त्याची जोडणी करावी. तसेच दिवा-माजिवडा, दिवा-तळोजा, भिवंडी आणि दिवा-बदलापूर या मार्गांना जोडणारे रस्ते तयार करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांवर अन्याय

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करताना संपुर्ण जागेवर भराव केला जात असून, काही ठिकाणी संपादित जमिनीबाहेरही माती टाकली जात आहे. काही कुटुंबांच्या प्रकरणांमध्ये पतीच्या नावावर घर आणि पत्नीच्या नावावर दुकान किंवा गाळा असतानाही दोघांना स्वतंत्र मोबदला मिळाला नाही. यामुळे महिलेच्या उपजीविकेचा आधार असलेले दुकान तोडले गेले, मात्र त्याचा मोबदला मिळाला नसल्याने महिलांवर अन्याय झाला आहे, असा आरोप मढवी यांनी केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीभोवती २० मीटरचा बफर झोन किंवा नो-डेव्हलपमेंट झोन जाहीर केला असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

सुनावणी इतर जिल्ह्यात

भूसंपादनाच्या सुनावण्या ठाणे जिल्ह्यात घेण्याऐवजी नाशिक, संभाजीनगर आणि पुणे येथे घेण्यात आल्याने दिव्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर फिरवून त्रास दिला जात असल्याचा आरोपही मढवी यांनी केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका, स्थानिक नगरसेवक आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.