ठाणे : देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील दिवे-अंजूर गावाजवळ १०० मीटर लांब आणि १ हजार ४०५ मेट्रिक टन वजनाचा स्टील पूल यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रात पूर्ण करण्यात आलेला हा पहिला स्टील पूल आहे. तामिळनाडूमधील त्रिची येथील कार्यशाळेत हा पूल तयार करण्यात आला होता.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे काम ‘एनएचएसआरसीएल’कडून सध्या ठाणे जिल्ह्यातील विविध भागात सुरू आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून उभारलेल्या या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बांधकाम हे १ हजार ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तामिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आले. तयार स्टील संरचना ट्रेलर्सच्या माध्यमातून आणून बांधकामस्थळी तिची जोडणी करण्यात आली. पुलाच्या निर्मितीमध्ये संरचनेनुसार आणि निर्धारित तांत्रिक मानकांनुसार अचूक जोडणी व रंगकाम करण्यात आले. तसेच, स्टीलच्या प्रत्येक उत्पादन बॅचची अल्ट्रासोनिक चाचणी करण्यात आल्याचे ‘एनएचएसआरसीएल’कडून सांगण्यात आले.
पुलाच्या जोडणीचे काम
बांधकामस्थळी १०० मीटर लांबीचा पूल जमिनीपासून सुमारे १७.५ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर २२ स्किड अरेंजमेंट्स आणि ५४ हजार ०७६ उच्च-शक्तीच्या टॉर-शिअर बोल्ट्सच्या साहाय्याने जोडण्यात आला. पुलाचा टिकाऊपणा आणि कंपन नियंत्रणाची क्षमता वाढविण्यासाठी संरक्षक रंगकाम प्रणाली आणि इलॅस्टोमेरिक बेअरिंग्जची तरतूद करण्यात आली आहे.
जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक्सचा वापर करण्यात आला. तसेच, प्री-टेन्शनिंग तंत्राच्या साहाय्याने स्वयंचलित यंत्रणेद्वारे पूल निर्धारित ठिकाणी सरकवून स्थापित करण्यात आला. महामार्गावरील वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होण्यासाठी रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करून हे काम करण्यात आले.
पुलाची वैशिष्ट्ये
– पुलाची लांबी : १०० मीटर
– मुख्य पुलाचे वजन : १ हजार ४०५ मेट्रिक टन – पुलाची उंची : १४ मीटर
– पुलाची रुंदी : १४ मीटर
– बुलेट ट्रेन मार्गिकेत एकूण २८ स्टील पूल प्रस्तावित असून त्यापैकी १६ पुलांचे बांधकाम पूर्ण
