Mumbai Ahmedabad Bullet Train Thane Station : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानकाची रचना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या स्थानकाचा कॉनकोर्स स्तर जमिनीपासून सुमारे १२ मीटर उंच ठेवण्यात आला आहे. यामागे ठाणे परिसरातील खारफुटीचे संरक्षण आणि पर्यावरणीय संवेदनशीलता हे प्रमुख कारण असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

प्रकल्पाच्या तपशीलानुसार, स्थानकाच्या आराखड्यात या परिसरातील खारफुटीच्या अस्तित्वाचा विचार करण्यात आला आहे. उंचावरील ‘कॉन्कोर्स’मुळे स्थानकाचा आसपासच्या पर्यावरण परिसरावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होते. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) कॉरिडॉरची लांबी ५०८ किलोमीटर असून तो महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील हा मार्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये उभारला जाणार.

खारफुटीचे नुकसान टाळण्यासाठी उंच कॉनकोर्स

ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाच्या परिसरात खारफुटीचे क्षेत्र असल्याने स्थानकाची रचना पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे. एनएचएसआरसीएलच्या माहितीनुसार, स्थानकाचा कॉनकोर्स नैसर्गिक जमिनीपासून सुमारे १२ मीटर उंच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील परिसरातील खारफुटीचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे. ठाणे स्थानक उल्हास नदीच्या जवळ असल्याने प्रवेश इमारतीच्या छताच्या रचनेला नदीतील पाण्याच्या लाटांचा आकार आणि हालचाल यांच्यातून प्रेरणा घेतली गेली आहे.

महाराष्ट्रातील शिळफाटा (ठाणे) येथे उभारणी सुरू असलेला स्टीलचा पूल

ठाणे स्थानक हे मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या महाराष्ट्रातील १३५.४५ किमी लांबीच्या जमिनीपासून उंची पातळीवरील असलेल्या मार्गाचा भाग आहे. हा मार्ग ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथून महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झारोली गावापर्यंत असेल. या मार्गावर अशी ३ स्थानके असतील:

  • ठाणे
  • विरार
  • बोईसर
बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाचे बांधकाम

या विभागाचा मोठा भाग वायाडक्ट आणि पुलांच्या स्वरूपात उभारला जात आहे. १३५.४५ किमी लांबीच्या या विभागापैकी सुमारे १२४.०२७ किमी भाग वायाडक्ट आणि पुलांचा आहे.

बोगदे आणि मोठ्या नद्यांवर पूल

महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन मार्ग शहरी, डोंगराळ आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागातून जाणार आहे. या विभागात सात डोंगरी बोगदे बांधले जात असून त्यापैकी तीन बोगद्यांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. बाकी कामांमध्ये ड्रेनेज, वॉटरप्रूफिंग आणि बोगद्याच्या अस्तर बसवणे यांसारख्या विविध कामांचा समावेश आहे.

या मार्गात नद्यांवर काही महत्त्वाचे पूलही उभारले जात आहेत. त्यात:

  • उल्हास नदीवर ४६० मीटरचा पूल
  • वैतरणा नदीवर २.३२ किमीचा पूल
  • जगणी नदीवर ५१० मीटरचा पूल
जगणी नदीवरील पूल खांब

याशिवाय प्रमुख रेल्वेमार्ग, उल्हास नदी, मुंबई-नाशिक महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर मिळून ३६ पूल आणि क्रॉसिंग असतील. त्यापैकी १२ स्टीलचे पूल असतील.

महाराष्ट्रातील या विभागात सध्या १०० किमीपेक्षा अधिक अंतरावर पिअर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी सुमारे ७४ किमीवरील खांब उभारणीसाठी तुळई तयार आहे. बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी महाराष्ट्रात नऊ कास्टिंग यार्ड, सात फुल-स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्री आणि आठ शेजारी शेजारी उभारलेले गॅन्ट्रीज कार्यरत आहेत.

ठाणे, विरार आणि बोईसर या तिन्ही स्थानकांचे कामही मार्गाच्या बांधकामासोबत वेगाने सुरू आहे.