मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला रासायनिक कचऱ्याच्या प्रदूषणाचा विळखा बसत आहे. या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक होत असते. त्यात प्रचंड प्रमाणावर रासायनिक पदार्थाचीही वाहतूक होत असते. महामार्गावर दररोजच रसायनांनी भरलेले अनेक टँकर उलटून अपघात होत असतात. या अपघातांत रसायन व रासायनिक पदार्थ रस्त्यात पसरून रासायनिक कचरा वाढत असल्याचे चित्र आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. महामार्गावरून अनेक प्रकारच्या ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक होत असताना अनेक वाहतूकदार हे रासायनिक प्रक्रिया न केलेला प्रदूषित माल आणि घनकचरा तसेच रासायनिक कचरा महामार्गाजवळील मोकळ्या जागेत टाकतात, तर काही वाहतूकदार रस्त्यालगतच्या शेतात हा कचरा टाकतात. या घनकचऱ्या रासायनिक पावडर, रासायनिक राख, तेल, इंधन, काचेचे तुकडे, प्लास्टिकचे तुकडे, मार्बल व कोटा यांचे तुकडे, तसेच प्रदूषित सांडपाणी यांचा समावेश असतो. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.