डोंबिवली : गर्भाशयात खोलवर वाढून मूत्राशयापर्यंत पोहोचलेल्या अर्थात प्लासेंटा पर्क्रिटा (वार) या गंभीर गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची एम्स रुग्णालयात सुरक्षित प्रसूती करण्यात आली. नियोजित शस्त्रक्रिया, ऑब्स्टेट्रिक हिस्टरेक्टॉमी व मूत्राशय दुरुस्तीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. या शस्त्रक्रियेत १.३ किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला.
शहापूर तालुक्यातील वासिंद येथील ममता जाधव यांचे हे दुसरे गर्भारपण होते. २८व्या आठवड्यात त्यांनी एम्स रुग्णालयात नोंदणी केली. तपासणीत ‘प्लासेंटा प्रिव्हिया’ म्हणजेच वार गर्भाशयाच्या मुखाजवळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ३०व्या आठवड्यात करण्यात आलेल्या ‘एमआरआय’मध्ये वार गर्भाशयाच्या भिंतीत खोलवर वाढल्याचे व मूत्राशयात गुंतागुंत निर्माण झाल्याची शक्यता दिसून आली.
३१व्या आठवड्यात महिलेला योनीमार्गातून रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचाराने रक्तस्रावावर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतरच्या सखोल तपासणीत ‘प्लासेंटा पर्क्रिटा विथ ब्लॅडर इन्व्हॉल्व्हमेंट’ असल्याचे स्पष्ट झाले. तसेच बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याचेही आढळले.
रक्तस्रावाचा धोका लक्षात घेऊन नियोजन
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्रुती कोटांगळे, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील पाटील, युरोलॉजिस्ट डॉ. विवेक जाधव, ऑन्कोसर्जन डॉ. सुप्रिया बामबारकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चेतना करंबेळकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक चव्हाण व डॉ. वैभव महांकाळे यांचा समावेश असलेल्या बहुविशेषज्ञ पथकाने उपचाराचे नियोजन केले. शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याची शक्यता असल्याने इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील पाटील यांनी ‘एओर्टिक बलून ऑक्लुजन’ प्रक्रिया केली. यात रक्तवाहिनीत बलून कॅथेटर टाकून काही काळ रक्तप्रवाह नियंत्रित करण्यात आला. त्यानंतर सर्वसाधारण भूलप्रक्रियेनंर शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर ऑब्स्टेट्रिक हिस्टरेक्टॉमी करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान वार मूत्राशयाच्या पृष्ठभागापर्यंत वाढल्याचे व गर्भाशयाच्या खालच्या भागाभोवती मोठ्या प्रमाणात रक्तवाहिन्या तयार झाल्याचे आढळले. युरोलॉजिस्ट डॉ. विवेक जाधव यांनी मूत्राशयातील दोष दूर केले.
प्लासेंटा प्रर्क्रिटा हा सर्वात गंभीर दोष आहे. वेळेवर वैद्यकीय चित्रणाच्या तपासण्यांमुळे या रुग्णाचे प्रसूतीपूर्वीच निदान झाले व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करता आली. अशा स्थितीत वार वेगळी करण्याचा प्रयत्न केल्यास जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान व नियोजित व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. – डॉ. श्रुती कोटांगळे
मूत्राशयाचा सहभाग असल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. रक्तस्राव नियंत्रित ठेवत काळजीपूर्वक हाताळणी व दुरुस्ती करावी लागली. संपूर्ण प्रक्रियेत विविध वैद्यकीय पथकांमधील समन्वय महत्त्वाचा ठरला.- डॉ. विवेक जाधव
आम्ही खूप घाबरलो होतो, पण डॉक्टरांनी परिस्थिती स्पष्टपणे समजावून सांगितली आणि कठीण काळात आम्हाला धीर दिला. – समीर जाधव, रुग्णाचे पती
