Mira Road Crime: मीरा रोडमधल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली आहे. त्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर काही तुकडे गॅसवर भाजले, काही मिक्सरमध्ये बारीक केले तर काही तुकडे शिजवले. तो तिच्या हत्येचे सगळे पुरावे नष्ट करत होता आणि मात्र शेजारी राहणाऱ्या लोकांना वास येऊ लागला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. मनोज साने आणि सरस्वतीची पहिली भेट २०१४ मध्ये झाली होती. काय घडलं होतं २०१४ मध्ये? मनोज साने आणि सरस्वती या दोघांची भेट २०१४ मध्ये एका रेशनच्या दुकानावर झाली होती. रेशन दुकानात झालेली ही ओळख पुढे वाढली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सरस्वती अनाथ होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं त्यानंतर हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मनोजलाही कुणी नातेवाईक नव्हते. तसंच सरस्वतीही अनाथ होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० वर्षांपासून जास्त काळ हे दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते. तीन वर्षांपासून मीरारोडच्या गीता नगर या ठिकाणी ते राहायला आले. मात्र सरस्वतीला मनोजच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते. मनोज साने स्वभावाला कसा होता? शेजाऱ्यांनी काय सांगितलं? मनोज साने यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने हा तीन वर्षांपासून सोसायटीत राहायला आला होता. मात्र त्याचं नावही अनेकांना माहित नव्हतं. तसंच तो फार कुणाशी संवाद साधत नव्हता, सणासुदीलाही तो कुणाशी संवाद साधत नव्हता. त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्याने विचारणा केली. त्यावेळी त्याने रुम फ्रेशनर घरात मोठ्या प्रमाणावर मारला आणि त्यानंतर निघून गेला. त्यामुळे लोकांचा संशय बळावला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. रेशन दुकानावर झालेली ओळख, दहा वर्षांचं प्रेम आणि त्यानंतर सरस्वतीची हत्या आणि तुकडे अशा भयंकर घटना या प्रकरणात घडल्या आहेत. मनोज सानेच्या शेजाऱ्याने काय सांगितलं? सानेच्या शेजाराऱ्याने ANI ला सांगितलं की, मनोज साने यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. मनोज साने हे कुणामध्ये मिसळत नव्हते. मी तीन वर्षे त्यांच्या शेजारी राहतो आहे पण त्यांचं नाव काय ते पण मला माहित नव्हतं. कुठल्याही सणासुदीलाही ते बाहेर पडायचे नाहीत. सोमवारी मला त्यांच्या घरातून वास येऊ लागला. मला वाटलं की उंदीर मेल्यामुळे वास येतील. आपल्या घराच्या शेजारी अशी काही हत्या वगैरे झाली असेल हे तर आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. आम्ही असं हत्याकांड, खुनाचे प्रकार हे सगळे टीव्ही सीरीयल्समध्ये पाहिले आहेत. सुरुवातीला वाटलं की उंदीर मेला असेल. मला वास आल्यानंतर मी साने यांना सांगितलं. त्यांच्या घराला अर्धावेळ तर कुलुप असायचं. मंगळवारी मी आल्यानंतर वास खूप मोठ्या प्रमाणावर आला. मी त्यांना बोलवायला गेलो. दार वाजवलं. पण काहीही प्रतिसाद आला नाही. मग मी थोडावेळ थांबलो तर मला रुम फ्रेशनरचा वास आला. रूम फ्रेशनरचा वास आल्यावर मला थोडा संशय आला. पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. मग मी वास असह्य होऊ लागल्याने जरावेळ खाली गेलो. तर १० मिनिटातच मनोज साने बॅग घेऊन खाली आले. मी त्यांना सांगितलं तुमच्या घरातून दुर्गंध येतो आहे. उंदीर वगैरे मेला आहे की आपण पाहू. तर ते म्हणाले मला तातडीने बाहेर जायचं आहे. मी त्यांना म्हटलं अहो पाच मिनिटं चला एकदा आपण पाहू काय झालंय का? पण त्यांनी काही ऐकलं नाही. ते घाईने निघून गेले. मी परत येतो तेव्हा पाहू म्हणाले. मग मी इमारतीच्या सेक्रेटरीला याविषयी सांगितलं. स्प्रे मारल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. पण जेव्हा मनोज साने खाली उतरले तेव्हा त्यांच्या अंगालाही दुर्गंधी येत होती आणि घाबरले होते. मला संशय होताच त्यामुळे सेक्रेटरींना सांगितल्यानंतर त्यांनी त्या एजंटला बोलावलं ज्याने तो फ्लॅट सानेंना दिला होता. एजंट आला, त्याच्याकडे चावी होतीच. पण तेव्हा वास येत नव्हता कारण तेव्हा त्यांनी रुम फ्रेशनर मारला होता. असं मनोज साने यांच्या शेजाऱ्याने सांगितलं आहे.