ठाणे – मुंबई नाशिक महामार्ग येथील खारेगाव पुलाजवळ गुरुवारी सकाळी दुचाकी आणि कंटेनरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दुचाकी चालक आकाश पुजारी (२०) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर सुमारे १ तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दुचाकी चालक आकाश पुजारी हा मुंबईतील दहिसर येथील रहिवासी होता. तो दुचाकीवरून एकटा मित्रांसोबत नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाकरिता जाण्यासाठी गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घरातून निघाला होता. तो मुंबई नाशिक रोड खारेगाव टोलनाक्याजवळ ५.४८ वाजताच्या सुमारास आला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे समोर असलेल्या कंटेनरच्या मागील चाकाखाली तो सापडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान दाखल झाले. आकाशचा मृतदेह वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मुंबई-नाशिक वाहिनीवरती खारेगाव टोलनाक्याजवळ सुमारे १ तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर व दुचाकी वाहन वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने रोडच्या बाजूला करण्यात आले असून, मुंबई-नाशिक रोड वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे.

