ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर टोईंग व्हॅनच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रताप यादव (३२) असे मृताचे नाव असून या अपघाता प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ठाण्यातील कोपरीगाव परिसरात प्रताप यादव हे वास्तव्यास होते. बुधवारी ते मित्रासोबत भिवंडी येथे कामानिमित्ताने दुचाकीने गेले होते. कामावरून घरी परतताना ते मुंबई नाशिक महामार्गाने ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होते. त्यांची दुचाकी मुंबई ढाबा परिसरात आली असता एका भरधाव टोईंग व्हॅनची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातामुळे प्रताप आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी ट्रकचे चाक प्रताप यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. प्रताप यांचा मित्र देखील गंभीर जखमी झाला.
अपघानंतर टोईंग व्हॅन चालक वाहन घेऊन तेथून निघून गेला. घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
