ठाणे : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा फटका आता मुंबई–पुणे वाहतुकीलाही बसला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव आज पहाटे ४ वाजल्यापासून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई–पुणे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने यंत्रणा दाखल झाली आहे. एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस आणि संबंधित विभागाकडून रस्त्यावर पडलेली दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सातत्याने सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे यामुळे बचाव आणि साफसफाईच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळल्याने काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या काही गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना प्रवासाला निघण्यापूर्वी द्रुतगती मार्ग आणि रेल्वे वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
