Mumbai Pune Expressway Traffic ST Bus: पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या द्रुतगती महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताला २२ तास उलटले तरी अजून या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. परिणामी, बुधवारी ठाण्याहून स्वारगेटकडे निघालेल्या एसटीतील प्रवाशांनी वाहतूक कोंडीच कळताच पनवेल येथेच गाडी परत फिरवण्याची मागणी केली. परिणामी, ठाणे एसटी आगारातून पुण्याकडे जाणारी एसटी सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी, (३ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता. अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. द्रुतगती महामार्गासह जुना पुणे-मुंबई मार्ग बंद असल्यामुळे २५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका एसटीला मोठ्याप्रमाणात पडला आहे. २२ तास उलटून गेले तरी ही कोंडी अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे एसटी गाड्या या कोंडीत अडकून आहेत.

ठाणे शहरातील वंदना आणि खोपट एसटी आगारातून दररोज पुणे शहरात एसटी सोडल्या जातात. यामध्ये इलेक्ट्रिक आणि ऑर्डिनरी गाड्यांचा समावेश असतो. ठाण्यातून नेहमी प्रमाणे सकाळी ९ वाजताची स्वारगेट एसटी सोडण्यात आली. त्यानंतर, ११ वाजताची एसटी सोडण्यात आली. परंतू, ही एसटी पनवेल पर्यंत पोहोचली आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचे समजले तसे त्यांनी वाहक आणि चालकास गाडी पुन्हा ठाण्याकडे वळविण्याची विनंती केली. वाहतूक कोंडीत अडकून राहण्यापेक्षा परतीचा प्रवास बरा अशीच प्रवाशांची भावना होती. यात, त्यांचे आर्थिक नुकसान झाले. परंतू कोंडीत अडकून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही याचेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यानंतर, ठाण्यातून एकही गाडी पुण्यात पाठविण्यात आली नाही, अशी माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली.

ठाणेहून पुण्यात जाणाऱ्या १० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द

ठाण्यातील वंदना आणि खोपट एसटी आगारातून दररोज पुणे शहरात १८ फेऱ्या सोडल्या जातात. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत या फेऱ्या सुरु असतात. मुंबई-पूणे एक्सप्रेस वरील कोंडीमुळे बुधवारी दहा पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवाशांना एसटी आगारातून यासंदर्भात कळविण्यात आले होते, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.