ठाणे : गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची मोठ्याप्रमाणात रेल्वे आणि एसटी प्रवासात गर्दी होते. यामध्ये महिला, बालकांचे प्रचंड हाल होता. ८ सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी ही दैनंदिन एक्स्प्रेस सुरु केली आहे. ही एक्स्प्रेस कशी धावते… तिचे वेळापत्रक काय आहे जाणून घ्या…
गणेशोत्सवानिमित्ताने काल, गुरुवारपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार भागात राहणारे अनेकजण त्यांच्या गावी कोकणात जाण्यासाठी निघाले आहे. काहीजण एसटी तर काहीजण रेल्वे मार्गाने प्रवास करत आहेत. शुक्रवारपासून प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. परंतु अनेकांना प्रवासासाठी नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या प्रवाशांचे हाल होण्याची भिती आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज एक नवीन एक्स्प्रेस धावत आहे. ८ सप्टेंबरपासून या सेवेला सुरुवात झाली असून, यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे असा दावा रेल्वेकडून केला जात आहे.
गाडीचे थांबे आणि मार्ग मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १५०८७-१५०८८ क्रमांकाची ही एक्स्प्रेस दररोज धावेल. ५०९ किलोमीटरचा प्रवास करणारी ही गाडी खालील प्रमुख थांब्यावर थांबेल.
या स्थानकांवर थांबेल एक्स्प्रेस :
सीएसएमटी,दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ, सावंतवाडी रोड.
वेळापत्रक (पावसाळी)
सीएसएमटी ते सावंतवाडी (१५०८७): मुंबई सीएसएमटीवरून रात्री ११.५५ वाजता सुटेल. ठाण्यात मध्यरात्री १२.३७ वा., पनवेलला पहाटे १.३० वा., रत्नागिरीला सकाळी ७.३० वा., कणकवलीला सकाळी १०.०२ वा., आणि सावंतवाडी रोडला दुपारी १.५० वाजता पोहोचेल.
सावंतवाडी ते सीएसएमटी (१५०८८): परतीच्या प्रवासात सावंतवाडी रोडहून सायंकाळी ५.०० वाजता निघेल. कुडाळ (५.३८ वा.), कणकवली (६.२० वा.), रत्नागिरी (रात्री ८.५० वा.), चिपळूण (रात्री १०.४० वा.) मार्गे ठाण्यात पहाटे ५.४९ वाजता आणि सीएसएमटीला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल.
२१ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल मध्य रेल्वेने पावसाळी आणि इतर कालावधीसाठी स्वतंत्र वेळापत्रक आखले आहे. २१ ऑक्टोबर २०२६ पासून बिगरपावसाळी वेळापत्रक लागू होईल.
सीएसएमटीहून सुटण्याची वेळ रात्री ११.५५ वा. राहील, मात्र ती सावंतवाडीला दुपारी १.५० ऐवजी २.१५ वाजता पोहोचेल. परतीची गाडी सावंतवाडी रोडहून सायंकाळी ५.०० ऐवजी ५.२० वाजता सुटेल. या एक्स्प्रेसचा सरासरी वेग ३५ ते ३८ किमी प्रतितास असून, संपूर्ण प्रवासासाठी साधारण १३ तास २० मिनिटे ते १४ तास २० मिनिटांचा वेळ लागेल. ही गाडी दररोज धावणार असल्याने मुंबई, ठाणे आणि कोकणातील प्रवाशांना पर्याय उपलब्ध असेल.
