ठाणे : मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान सुरू होणाऱ्या नव्या एक्स्प्रेस (दैनिक) रेल्वे सेवेला मंजुरी मिळाल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ठाणे शहराच्या पुढील भागांतील प्रवाशांना या एक्स्प्रेसचा थेट लाभ मिळणार नाही. या गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवा, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर परिसरातील मोठ्या संख्येने राहणाऱ्या कोकणवासीयांना ठाणे स्थानक गाठावे लागणार आहे.
दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ व बदलापूरमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात प्रवास करतात. त्यासाठी दिवा स्थानक सोयीचे आहे.
नव्या दैनिक एक्सप्रेसला प्रस्तावित करण्यात आलेल्या थांब्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी रोड यांचा समावेश आहे.
दिवा स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्याची मागणीही सातत्याने पुढे येत आहे. कोकण रेल्वेच्या नव्या सेवांमध्ये दिव्याचा समावेश झाल्यास ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार काही प्रमाणात कमी होण्यासोबतच पूर्व उपनगरांतील कोकण प्रवाशांसाठी थेट आणि सोयीची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
ठाणे स्थानकावर भार
ठाणे स्थानकावर आधीच प्रवाशांचा मोठा भार असताना नव्या दैनिक कोकण एक्स्प्रेसमुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दिवा ते बदलापूर तसेच ठाणे ते भांडुपदरम्यानच्या परिसरातील हजारो कोकण प्रवाशांना ही गाडी पकडण्यासाठी ठाणे गाठावे लागणार आहे. त्यामुळे दररोज अतिरिक्त प्रवाशांची गर्दी ठाणे स्थानकावर होऊ शकते. याउलट या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास ठाणे जिल्ह्याच्या इतर भागातील मोठा प्रवासी वर्ग थेट दिवा स्थानकातूनच कोकणाकडे रवाना होईल आणि ठाणे स्थानकावरील गर्दीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.
नव्या एक्स्प्रेसला दिवा स्थानकावर थांबा देण्यात यावा. तसेच कोकण मार्गावर धावणाऱ्या इतर विशेष गाड्यांनाही दिवा येथे थांबा मिळावा. ठाणे स्थानकावर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. – आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
