डोंबिवली: परदेशातील मालमत्तेचा वारसा हक्क मिळवून देतो असे मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाला आमिष दाखवून डोंबिवलीतील एका व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख ७२ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील तक्रारदार खुशीरीद दिन्यार दारुवाला (७२, सेवानिवृत्त, रा. ७/ए, मेहेरबाई वाडिया बिल्डिंग, वाडिया स्ट्रीट, ताडदेव, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संजय भिकाजी देशपांडे, (५०, राहणार, १० आशिष बंगला, चिरायु हॉस्पिटल समोर, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीप्रमाणे मिळालेली माहिती, अशी की सन २०१४ पासून ते मे २०२६ पर्यंत याप्रकरणातील गुन्हा दाखल संजय देशपांडे यांनी मयत चेट्टी यांची तक्रारदार दारूवाला यांना अधिकार दिलेली विविध ठिकाणची परदेशातील मालमत्ता वारसहक्काने मिळवून देतो असे सांगितले. या प्रकरणाच्या माध्यमातून देशपांडे यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.

परदेशातील मालमत्तेचा वारसा हक्क मिळतो म्हणून तक्रारदार दारूवाला, तसेच साक्षीदार केदार खराडकर यांच्याकडून गुन्हा दाखल देशपांडे यांनी टप्प्या टप्प्याने ५ लाख ७२ हजार ६०० रुपये ऑनलाईन बँक व्यवहार व रोख स्वरूपात घेतले.

सर्व रक्कम देऊन झाल्यावर तक्रारदार यांनी देशपांडे यांच्याकडे वारसा हक्काचा ताबा मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी तगादा लावला. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. काम होणार नसेल तर पैसे परत करण्याची मागणी या दोघांकडून करण्यात येऊ लागली. त्याला गुन्हा दाखल देशपांडेकडून प्रतिसाद देण्यात आला नाही.

प्रत्यक्षात कोणतीही वारसहक्काबाबत कायदेशीर पूर्तता न करता फिर्यादीच्या तक्रारदार दारूवाला यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक केली व त्यांनी दिलेल्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बुनगे करीत आहेत.