कल्याण – मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कसारा, कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलवरील प्रवासी भार कमी व्हावा याकरिता रेल्वे प्रशासनाकडून ठाणे रेल्वे स्थानकातून कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ दिशेने यापूर्वी सुमारे ३२ शटल सेवा सुरू केल्या होत्या. यामधील बहुतांशी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या शटल सेवा पूर्ववत करण्यात याव्या, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांच्याकडे केली.
ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती. मुंबईकडून कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल घाटकोपर, ठाणे स्थानकापर्यंत प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. या गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये ठाणे स्थानकात प्रवाशांना चढता येत नाही. अशावेळी प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या शटल सेवेवर अवलंंबून राहत होते.
मागील काही महिन्यांपासून या शटल सेवेच्या फेऱ्या ३२ वरून १६ वर आणण्यात आल्या आहेत. निम्म्याहून अधिक फेऱ्या कमी केल्याने सहाजिकच प्रवासी मुंबईहून येणाऱ्या लोकलवर अवलंबून राहावे लागते. या लोकलमध्ये आटापिटा करून गर्दीतून ते प्रवास करतात, असे उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. या शिष्टमंडळात उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, नंदकुमार देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
सकाळी साडे सात ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत आसनगाव, अंबरनाथ भागातून ठाण्यापर्यंत शटल सोडण्यात याव्यात. अशाच पध्दतीने ठाणे येथून संध्याकाळी कर्जत, आसनगाव, कसारा, बदलापूर, दिशेने शटल सोडण्यात याव्यात, असे उपनगरीय सेवेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यापूर्वीप्रमाणे शासनस्तरावर पाठपुरावा करावा. रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रवाशांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बैठकीसाठी मागणी करत असतात. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अशा भेटींसाठी टाळाटाळ करतात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मेल, एक्सप्रेस गाड्या सकाळच्या वेळेत अधिक संख्येने धावणार नाहीत, याचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कोपर ते मुंब्रा दरम्यान रेल्वे वळण मार्गामुळे होणाऱ्या अपघातांचा विचार करून दिवा ते दादर, मुंबईच्या दिशेने सकाळच्या वेळेत लोकल सोडण्याची मागणी दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे करत आहोत. पण, तांत्रिक कारण देत रेल्वेकडून आपल्या तक्रारी बेदखल केल्या जात आहेत. मुंब्राच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने जागे व्हावे. – आनंदा पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती, दिवा.
कल्याण ते कर्जत, कसारा येथील तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेची कामे रेल्वे प्रशासनाने पूर्ण करावीत. यामुळे लोकल, लांब पल्ल्यांच्या मार्ग स्वतंत्र होऊन प्रवाशांचा प्रवास सुखाचा होईल. – विजय देशेकर, विभागीय उपाध्यक्ष, कल्याण कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.