बदलापूर: मे महिना संपत आला तरी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात उकाड्याचा त्रास प्रचंड वाढला आहे. शुक्रवार, २९ मे रोजी मुंबईत मे महिन्यातील चौथी सर्वात उष्ण रात्र नोंदवली गेली. मुंबईतील सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान तब्बल २९.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उकाड्याची ही तीव्र परिस्थिती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि कर्जतपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या १३ वर्षांतील मे महिन्यातील या सर्वात उष्ण रात्री ठरल्या आहेत.

बदलापूर येथील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील बहुतांश शहरांमध्ये रात्रीचे किमान तापमान २९ ते ३० अंशांच्या पुढे गेले आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वाधिक म्हणजे ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पनवेल आणि पलावा येथे ३०.३ अंश, बिरवाडी येथे ३०.२ अंश, तर अंबरनाथमध्ये ३०.१ अंश सेल्सिअस तापमान राहिले. ठाणे आणि नवी मुंबईत रात्रीचा पारा ३० अंशांवर स्थिर होता. तर बदलापूर आणि मनोर येथे २९.८ अंश, नेरळमध्ये २९.७ अंश, कर्जतमध्ये २९.६ अंश, पालघरमध्ये २९.१ अंश आणि सुकसाळे येथे २९.० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. रात्रीच्या वेळीही तापमान इतके चढे राहिल्याने नागरिकांना प्रचंड अंगाची लाहीलाही आणि रात्रीच्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

हवामानातील या बदलाचे आणि रात्रीच्या वाढत्या तापमानाचे मुख्य कारण म्हणजे वातावरणातील वाढलेली आर्द्रता, रात्रीच्या वेळी असलेले ढगाळ वातावरण आणि वाहणारे वारे हे आहे. सामान्यतः रात्रीच्या वेळी आकाश निरभ्र आणि हवा शांत असेल, तर दिवसा जमा झालेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते आणि जमीन लवकर थंड होते, ज्यामुळे रात्री तापमान खालावते. मात्र, सध्याच्या ढगाळ आणि दमट वातावरणामुळे ही उष्णता हवेतच कोंडून राहते आणि पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी रात्रीचा उकाडा कमालीचा वाढतो. मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जूनच्या सुरुवातीला किमान तापमान २९ अंशांच्या वर राहणे ही मान्सूनपूर्व हवामानाची नेहमीचीच पद्धत आहे. जोपर्यंत नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे क्षेत्रात अधिकृत आगमन होत नाही, तोपर्यंत हा मान्सूनपूर्व उकाडा असाच कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

बदलापुरात उच्चांकी

बदलापूर शहरातही उष्णतेने नवा इतिहास रचला आहे. बदलापूरमध्ये कालची रात्र ही गेल्या १३ वर्षांतील सर्वात उष्ण रात्र ठरली आहे. शुक्रवारी, ३२९ मे रोजी बदलापूरमध्ये रात्रीचे किमान तापमान तब्बल २९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. २०१३ पासून उपलब्ध असलेल्या हवामानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बदलापुरातील रात्रीच्या तापमानाने गाठलेला हा आतापर्यंतचा सर्वोच्चांक आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण पट्ट्यात नागरिकांना रात्रभर असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असून, यंदाच्या मे महिन्यातच बदलापूरने उष्णतेचे दोन मोठे विक्रम मोडले आहेत.