उपकेंद्राचे ७० टक्क्यांहून अधिक काम अद्याप अपूर्ण

दगड मातीचे ढिगारे.. लोखंडी सळ्या, सिमेंटचे ब्लॉकचे थर.. दारे, खिडक्या, छताची अपूर्ण कामे .. प्रवेशद्वाराचे सुरू असलेले बांधकाम.. अर्धवट रंगरंगोटी आणि परिसरात केवळ खडकांचे ढिगारे..हे चित्र एखाद्या अर्धवट स्थितीतील गृहसंकुलाच्या बांधकामाचे नाही तर कल्याण शहरातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीचे आहे. यंदाच्या वर्षी या इमारतीमध्ये नव्या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करण्याचा विद्यापीठाचा मनोदय असला तरी येथील मंदगतीने सुरू असलेले काम पाहता पुढील तीन महिने तरी विद्यार्थ्यांसाठी ते खुले होण्याची शक्यता कमीच आहे.

विद्यापीठाने ३० जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ही शक्यता तर अगदीच धूसर असल्याचे येथील परिस्थिती पाहून लक्षात येते. ठाण्याप्रमाणे कल्याण आणि आसपासच्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने कल्याण शहरात उपकेंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. महापालिकेकडून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर उपकेंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. २०१३ पासून सुरू झालेले काम २०१५ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते व त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात होण्याची आवश्यकता होती. मात्र विद्यापीठाने ठरवून दिलेल्या मुदतीस दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी इमारत अद्याप अपूर्णावस्थेत आहे. यंदाच्या वर्षी शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी ३० जून २०१६ पर्यंत ही इमारतीचा तळ आणि पहिला मजला पूर्ण करून देण्याचे आदेश बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती तसे नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

काम पूर्णत्वाची मुदत टळणार

उपकेंद्राचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी पुढील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात विद्यापीठाचे अभियंता विनोद पाटील यांनी यासंबंधी बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी ३० जूनपर्यंत इमारतीची कामे पूर्ण करून विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. विद्यापीठात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी शैक्षणिक विभाग, प्राचार्य कक्ष, उपप्राचार्य कक्ष, कर्मचारी, प्रशासकीय विभाग, साहाय्यक, कारकून, लेखा कर्मचारी, संगणक चालक, प्रयोगशाळा, वर्ग, स्वच्छतागृह, अशा वेगवेगळ्या खोल्यांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत. तसेच या कामाचे भोगवटा प्रमाणपत्रही घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक टेबल-खुच्र्या, कार्यालयीन साहित्याचीही उपलब्धता करून विद्यापीठाचे शैक्षणिक उपक्रम सुरू होईल, असा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

९० टक्केकामाचा दावा

उपकेंद्राच्या इमारतीचे काम ९० टक्के झाले असून ते ३० जूनपूर्वी पूर्ण होऊ शकेल असा दावा येथे काम करणाऱ्या अभियंत्यांकडून करण्यात आला आहे. मात्र परिसरातील अन्य सुविधांसाठी मात्र पुढील काही काळ काम करावे लागण्याची शक्यता आहे.  इमारत लवकरच विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात येईल, असेही ठामपणे अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे.