कल्याण : टिटवाळा बल्याणी येथील एका चाळीतील रहिवाशाच्या जमिनीचा मूळ मालकाने यापूर्वीच मोबदला घेतला होता. तरीही काही मध्यस्थांनी एकत्र येऊन चाळीत यापूर्वी राहत असलेल्या एका रहिवाशाचे बनावट जमीन कागदपत्र तयार करून, स्वाक्षरी वापरून मुंबई-बडोदे महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेतून २ कोटी ८ लाख ६० हजार ४७६ रुपये उकळले. या फसवणूकप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोहम्मद शाहिद मिठाईवाला (वय ४६) असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. ते संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करतात. ते टिटवाळा येथील बल्याणी गावातील गावदेवी मंदिराशेजारील एका चाळीत राहतात. मोहम्मद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी साजिद शरफुद्दिन रईस, कासीम बाळमिया गुजर, मारूफ सादिक कुंगळे व अन्य एक अज्ञात इसम या मध्यस्थांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद मिठाईवाला यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मुंबई बडोदा महामार्गाचे भूसंपादन होत असताना आपणास आपल्या मालकी हक्काच्या जमिनीचा पाच वर्षांपूर्वी मोबदला मिळाला. आपणास २०२२ मध्ये समजले की, आपल्या नावे बल्याणीतील सर्व्हे क्र. ३-४ वरील भूसंपादनाचा २ कोटी ८ लाख ६० हजार रुपयांचा निवाडा कल्याणच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर झाला आहे. स. क्र. ३-४ जमीन व त्यावरील नऊ चाळींचा मोबदला यापूर्वीच जमीन मालक मारूफ सादिक कुंगळे यांनी घेतला होता. त्या जमीन व मोबदल्याशी आपला कोणताही संबंध नव्हता.

मध्यस्थांचे पितळ उघड

त्यानंतर आपण उपविभागीय कार्यालयातून आपल्या निवाड्यासंदर्भातची माहिती मागवली. त्या नस्तीमध्ये आपण शासनाकडे बल्याणीतील स. क्र. ३-४ जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी अर्ज केला नसताना त्यात आपण मोबदल्यासाठी अर्ज केल्याचे व त्या अर्जावर आपली बनावट स्वाक्षरी केली असल्याचे दिसले. या नस्तीत आपणास गुन्हा दाखल साजित रईस, कासीम गुजर, मारूफ कुंगळे यांनी नोटरी केलेला विकसन करारनामा आढळला. या नस्तीत भूसंपादनाची रक्कम साजिद रईस यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मी संमतीपत्र दिल्याचे आढळले. या पत्रावर माझी बनावट स्वाक्षरी आढळली. विकसन करारनामा, संमतीपत्रात १० वर्षांचा फरक होता. तरीही दोन्ही ठिकाणी माझी एकच प्रतिमा लावण्यात आली होती.

डिसेंबर २०२१मध्ये उपविभागीय अधिकारी, कल्याण यांनी आपला बल्याणी येथील स. क्र. ३-४ जमीन, बांधकामाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या नावाचा बनावट भूसंपादन निवाडा जाहीर करून त्याची २ कोटी ८ लाख रुपये रक्कम साजिद रईस यांच्या बँक खात्यात जमा केली. हा सर्व गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली.

मध्यस्थ शरणागत

या तक्रारीनंतर साजिद रईस यांनी उपविभागीय अधिकारी यांना बल्याणीतील संबंधित चाळधारकांचे पुनर्वसन होऊ शकले नाही, त्यामुळे निवाडा रकमेतील एक कोटी ८० लाख ९७ हजार ७४७ रूपये आपण शासनास जमा करण्यास तयार आहोत, असे पत्र उपविभागीय अधिकारी यांना दिले. या पत्राप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी साजिद यांना १ कोटी ८० लाखाची रक्कम शासन जमा करण्याचे निर्देश दिले. आपल्याप्रमाणे मुंबई-बडोदे मार्गासाठी भूसंपादन करताना बल्याणी गावातील २-११,.६-३, २७-३ अ, ७६-१, ७६-३, ७३-३७ पैकी ७३-३४, ७३-३५, ७३-३६, ७३-४०, १००-८ पैकी, तसेच, उंभार्णी, नांदप, मानिवली, वाहोली, रायते गावातील सर्व्हे क्रमांकावर बांधकामे अस्तित्वात नसताना ती अस्तित्वात असल्याचे दाखवून, एकाच बांधकामाचे दोन ते तीन वेळा निवाडे जाहीर करून, बनावट लाभार्थी जाहीर करून शासनाची फसवणूक व भूसंपादन रकमेचा अपहाऱ करण्यात आला आहे, असे आपणास समजले असल्याचे मोहम्मद यांनी तक्रारीत म्हटले आहे.