ठाणे : येथील तीन हात नाका परिसरात तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवारी सायंकाळी ५ वाजता पूर्ण करण्यात आले आहे. जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर रात्री ९ वाजल्यापासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होण्याची अपेक्षा होते.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका भागात मुंबई महापालिकेची मुंबई-III ही जलवाहिनी आहे. गुरुवार, १३ ऑगस्टला रात्री जलवाहिनीला गळती आढळून आली होती. महापालिका जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून तात्पुरत्या स्वरूपात बंद केले. यानंतर क्षतिग्रस्त जलवाहिनीच्या भागाभोवती खोदकाम करण्यात आले. तेथील साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात आला. नादुरुस्त झालेल्या भागावर मृदू पोलादाची पॅच प्लेट बसवून वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, शनिवारी, १५ ऑगस्टला जलवाहिनीला पुन्हा गळती लागली. जलवाहिनीतील पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.

पिसे उदंचन केंद्र आणि पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्प यांच्याशी समन्वय साधून जलवाहिनीतील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यात आला. त्यानंतर क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली. जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने गळती दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळी ५ वाजता पूर्ण केले. जलवाहिनी पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जात होता.