ठाणे : मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरात खासगी बसगाडीची दुचाकीला धडक बसल्याने बसगाडीच्या चाकाखाली येऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. संगम पुलशरे (२१) आणि अविनाश दवंडे (१९) अशी मृतांची नावे असून महेश वारे (१८) हा अपघातात जखमी झाला. अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात झाली आहे.

मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात राहणारे संगम, अविनाश आणि महेश एका दुचाकीने एमएम व्हॅली परिसरातून जात होते. त्याचवेळी एका खासगी बसगाडीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली.

त्यामुळे तिघेही बसगाडीच्या पुढील चाकाखाली आले. संगम आणि अविनाश यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर महेश हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात झाली असून मृतांचे शव विच्छेदनासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहेत.