ठाणे – नीट पेपरफुटीच्या वादानंतर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आलेल्या मुंब्र्यातील आयशा अनीस हिने पुनर्परीक्षेत ५४४ गुण मिळवत यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निकालानंतर तिने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही तिने केले.

नीट पेपरफुटीनंतर मोठा वाद निर्माण झाला. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी संताप व्यक्त केला होता. याच पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. असे असतानाच, नीट पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात नीट पेपरफुटीच्या वादानंतर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आलेल्या मुंब्र्यातील आयशा अनीस हिने पुनर्परीक्षेत ५४४ गुण मिळवत यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी तिचा सत्कार केला. यावेळी डावखरे यांनी आयशाच्या जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

आयशाचे विद्यार्थ्यांना आवाहन

पहिल्या परीक्षेत ५९२ गुण मिळाले होते. मात्र, पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पुनर्परीक्षा देण्याची वेळ आली. या काळात शासनाकडून संबंधित प्रकरणात कारवाई सुरू झाल्याने आपण पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि पुनर्परीक्षेत ५४४ गुण मिळवत यश संपादन केल्याचे आयशाने सांगितले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही तिने केले.

ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

आयशाच्या यशाबद्दल आमदार डावखरे यांनी तिचे अभिनंदन करत, तिची जिद्द आणि मेहनत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवून यश मिळविणाऱ्या आयशाचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

दोषींवर कठोर कारवाई होईल

नीट पेपरफुटी प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नसून, दोषींवर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली असून, दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून प्रक्रिया गतीमान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असून त्यासाठी सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. या विषयाचे राजकारण न करता विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.