ठाणे : मुंब्रा येथे नागरिकांकडून बकरीद साजरी होत असतानाच, दुसरीकडे मुंब्रा येथे एका नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरु आहे. नुरुल होदा समद चौधरी (२६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मुंब्रा येथील कौसा भागातील रहिवासी आहे. मुंब्रा येथे मुस्लिम धर्मीयांचा बकरीद सण साजरा केला जात होता. अनेकांनी सणासाठी दुकाने देखील बंद ठेवली होती. आनंदात सण साजरा होत असतानाच, दुसरीकडे मुंब्रा शहरातून वाईट बातमी आली. मुंब्रा येथील वाय जंक्शन भागात हे प्रकरण उघडकीस आले आहे.

शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे, महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारीही घटनास्थळी आले. मुंब्रा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यातून मृतदेह काढला. मृतदेहाजवळ एक दुचाकी देखील आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी मालकाला संपर्क साधला असता, दुचाकी मालकाचे नाव कमरुल चौधरी असल्याचे आढळले. त्यांना तात्काळ घटनास्थळी बोलाविण्यात आले.

कमरुल यांचा भाऊ नुरुल हा २६ मे पासून बेपत्ता होता. त्यांनी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नुरुल बेपत्ता असल्याची नोंद दिली होती. मृतदेहाची पाहणी केली असता, तो नुरुल याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात अपमृत्यू दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर नुरुल याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.