ठाणे : मुंब्रा रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) अशी मृतांची नावे असून, तिघेही मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी आहेत. तिघेही रविवारी दुपारी तीनच्या सुमारास खाडीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल तसेच नारपोली आणि कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून तिघांना सायंकाळी ४.२० वाजताच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
