ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा खाडी भागात लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. साईराज बेणारे (२७) असे मृत मुलाचे नाव असून तो उल्हासनगर येथील रहिवासी आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास सुरु आहे.
मुंब्रा खाडी परिसराती सकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती लोकलमधून पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. हा व्यक्ती लोकलमधून पडून खाडीतील लोखंडी रॉडला अडकला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मुंब्रा पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलिसांच्या मदतीने खाडीतील लोखंडी रॉडला अडकलेला व्यक्तील बाहेर काढले असता, त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हा मृतदेह उल्हासनगर येथील आर.जी.एस. शाळेजवळ राहणाऱ्या साईराज याचा असल्याचे उघड झाले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून तो छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. साईराज लोकलमधून नेमका कोणत्या कारणामुळे पडला, याबाबत रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अपघाताच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
