ठाणे : भिवंडीतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटना ताजी असतानाच, मुंब्र्यातही धोकादायक इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून खांबाला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे आढळले असून यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावल्या आहेत.
मुंब्र्यातील कौसा परिसरात धोकादायक इमारतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. चांदनगर येथील सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटमधील स्लॅबचे प्लास्टर कोसळले असून, इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
या घटनेची माहिती शनिवारी दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास पालिका प्रशासनाला मिळाली. धूम अपार्टमेंट ही तळमजला अधिक पाच मजली इमारत असून, तिचे बांधकाम अंदाजे २० वर्षे जुने आहे. महापालिका वर्गीकरणानुसार ही इमारत सी-१ प्रवर्गातील म्हणजेच अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यानंतर पालिका पथकाने पाहणी केली असता, काही कॉलमला तडे गेल्याचे आढळले. त्यामुळे इमारतीच्या उर्वरित भागालाही धोका निर्माण झाला आहे.
या इमारतीत एकूण ४२ सदनिका आहेत. त्यापैकी सध्या २२ सदनिकांमध्ये कुटुंबे वास्तव्यास असून, या रहिवाशांची संख्या अंदाजे १६० ते १७० इतकी आहे. त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त विजय कावळे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना इमारत लवकरात लवकर रिकामी करण्याच्या सूचना महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीमार्फत नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. यापुढील आवश्यक कार्यवाही मुंब्रा प्रभाग समिती आणि बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी इमारत रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होतात का, याकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
