ठाणे – मुंब्रा-दिवा खाडी किनारी भागातील १०३ हेक्टर पेक्षा अधिक जागेवर कचरा आणि राडारोड्याचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आल्याची गंभीर दखल घेत हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने ठाणे पालिकेला फटकारले आहे. संबंधित जागेवरील कचरा तीन आठवड्यांत हटविण्याचे आदेश देत यापुढे त्या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देशही लवादाने पालिकेला दिले आहेत. संबंधित कचरा मुंबई महापालिकेचा असल्याने त्यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंब्रा-दिवा खाडीकिनारी भागात कचरा आणि राडारोड्याचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली असून याप्रकरणी वनशक्ती संस्था सातत्याने आवाज उठवित आहे. परिसराच्या पाहणीत सुरूवातीला ६६ एकर जागेवर भराव टाकण्यात आल्याचा दावा संस्थेने केला होता. मात्र, भराव टाकण्यात आलेले क्षेत्र १०३ हेक्टर पेक्षा अधिक असल्याचे आता समोर आले आहे. विशेषतः रेल्वे रुळांलगतही भराव टाकण्यात आल्याने पावसाळ्यात पाणी साचून रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली होती. खाडीकिनारी भराव टाकून खारफुटी नष्ट केल्याप्रकरणी दिवा येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत संबंधित खाडीकिनारी जागेवर कचरा आणि राडारोडा पडलेला असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ जुलै रोजी ठाणे पालिकेला पत्र पाठवून कचरा टाकणे तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कचरा हटविण्याचा प्रश्न कायम राहिल्याने वनशक्ती संस्थेने हरित लवादाकडे दाद मागितली होती. दरम्यान, वनशक्ती संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर २१ ऑगस्ट रोजी हरित लवादाच्या पुणे खंडपीठासमोर सुनावणी झाली.

तीन आठवड्यांत कचरा हटवा वनशक्ती संस्थेच्या वकिलांनी संबंधित जागेवरील कचरा हटविण्याचे आदेश देण्याची मागणी केली. त्यावर हरित लवादाने ठाणे पालिकेला तीन आठवड्यात जुना साचलेला कचरा हटविण्याचे आदेश दिले. तसेच केवळ कचरा हटविणे नाही, तर यापुढे त्या जागेवर कोणताही घनकचरा किंवा राडारोड्याचा कचरा टाकला जाणार नाही, याची खात्री करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. हा कचरा मुंबई महापालिकेचा असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हरित लवादाने मुंबई महानगरपालिकेलाही या प्रकरणात दहावा प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पालिकेलाही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. तसेच या प्रकरणात ठाणे पालिकेला चार आठवड्यांत उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुढील सुनावणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. प्रतिक्रिया मुंब्रा-दिवा खाडी किनारी भागातील १०३ हेक्टर पेक्षा अधिक जागेवर कचरा आणि राडारोड्याचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली आहे. हा कचरा मुंबई महापालिकेचा असल्याचे ठाणे पालिकेकडून सांगण्यात आले असून तसे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मुळात ही जागा ठाणे पालिका क्षेत्रात येत असल्याने त्यांनी कचरा टाकणे थांबविणे गरजेचे होते. त्यांनी तसे केले नसून लवादने आता त्यांना कचरा तीन आठवड्यात हटविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी. यांनी दिली.