ठाणे : मुंब्रा-दिव्यातील बेकायदा नळजोडण्या व टँकरसाठी सुरू असलेली पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारपासून ही मोहीम सुरू झाली. पुढील तीन दिवस ही विशेष मोहीम राबवली जाईल. वाहन धुलाई केंद्र, व्यावसायिक वापर, खासगी टँकर भरण्यासाठीच्या जोडण्यांसह घरगुती बेकायदा नळजोडण्यांवरही कारवाई केली जाईल. गेल्या तीन महिन्यांत ६५ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. पुन्हा जोडणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील कल्याण फाटा ते वाय जंक्शन परिसरातील अनधिकृत व्यावसायिक, वाहन धुलाई केंद्र व खासगी टँकरसाठीच्या पाणी जोडण्यांवर तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात वाय जंक्शन ते मुंब्रा फायर केंद्रापर्यंतच्या परिसरातील अनधिकृत जोडण्यांवर कारवाईसाठी कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान अनधिकृत पाणी जोडणी खंडित करण्यात आल्यानंतर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, खंडित करण्यात आलेली जोडणी पुन्हा सुरू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

अधिकृत ग्राहकांना नियमानुसार पाणीपुरवठा करणे अधिक प्रभावी होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. अधिकृत प्रक्रियेद्वारेच नळ जोडणी घेण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. अनधिकृत नळ जोडण्या करून पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील. असे ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले.

नळ जोडण्यांवर कारवाई

  • ठाणे महानगरपालिकेच्या दिवा तसेच मुंब्रा पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीचोरी रोखण्यासाठी व नागरिकांना नियमानुसार पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात विशेष मोहीम याआधी हाती घेण्यात आली होती.
  • या अंतर्गत मे, जून व जुलै २०२६ या कालावधीत मुंब्रा दिवा परिसरातील विविध भागांत तपासणी करून एकूण ६५ अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करण्यात आली.
  • संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे. यात मे महिन्यात गणेश नगर, सोनेतळा नगर, आगासन गाव, लालानी नाका तसेच कोसा गाव परिसरातील २१ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
  • याशिवाय जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले ४० ओव्हरव्हॉल्व्ह नळही काढून टाकण्यात आले. जून महिन्यात महालक्ष्मी नगर, शिळफाटा, सद्गुरू नगर, लालानी नाका, गुलाब पार्क या भागांमध्ये मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान २० अनधिकृत नळ जोडण्या खंडित करून संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
  • जुलै महिन्यात कोसा गाव, शिवाजी नगर, बडेकर मळा, दिवा पूर्व तसेच इतर परिसरांमध्ये विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेत २४ अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.