Mumbra Thane Train Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये पाच लोकल प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५ ते ७ रुग्णांवर कळवा व ज्युपिटर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळच ही दुर्घटना घडली. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील एका वळणावर एकमेकांच्या अतिशय जवळ आल्या. यात दोन्ही लोकलमध्ये दरवाजावर उभं राहून प्रवास करणारे काही प्रवासी एकमेकांचा धक्का लागून खाली पडले. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळासोबतच प्रवासी संघटनांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्रीकांत शिंदेंनी दिवा-सीएसएमटी लोकल सुरू करण्याच्या स्थानिकांच्या मागणीला समर्थन दिलं.

कसा झाला अपघात?

“अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकलच्या मध्ये काही जण खाली पडले. त्यापैकी १० प्रवाशांना कळवा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यातल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलेल्या प्रवाशांचाही आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. त्यामुळे या दुर्घटनेत एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी काहींवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. जखमी रुग्णांवर ज्युपिटर आणि कळवा रुग्णालयात उपचार चालू आहेत”, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं.

“मुंब्रा स्थानकाजवळ एक वळण आहे. तिथून या दोन लोकल विरुद्ध दिशेनं जात होत्या. तिथे दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांचा धक्का लागून खाली पडले. याबाबत नेमकी स्पष्टता अद्याप आलेली नाही. पण दोन्ही लोकलमधले प्रवासी खाली पडले. यातील काही प्रवासी ट्रेनच्या आतही पडल्यामुळे जखमी झाले आहेत”, असंही शिंदे यांनी नमूद केलं.

लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं – श्रीकांत शिंदे

“कर्जत-कल्याण भागात मोठ्या प्रमाणावर लोक राहायला गेले आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ झाली. पण सीएसटीपर्यंत ही पाचवी व सहावी मार्गिका जायला हवी. त्यावर रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. त्यानंतर लोकल गाड्या वाढू शकतात. त्याशिवाय कल्याणच्या पुढे तिसरी व चौथी मार्गिका टाकण्यासाठी जमीन अधिग्रहण वगैरे प्रक्रिया चालू आहे”, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिवा-सीएसटी लोकल चालू करण्याची मागणी केली जात आहे. इथे जलदगती लोकलच्या थांब्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. पण या मार्गिकेवर जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवायला हव्यात. पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत जाईल, तेव्हा हे शक्य होऊ शकेल”, असंही श्रीकांत शिंदेंनी नमूद केलं.