ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात दाटीवाटीत असलेल्या एका इमारतीमधील घराला आग लागल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले असताना, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी प्रसंगावधान राखत धाडसी पाऊल उचलले. अग्नीशमन दल येण्यापूर्वीच त्यांनी आग लागलेल्या इमारतीत शिरून वीजप्रवाह खंडित करत रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

ठाण्यातील मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील एम.के. कंपाऊंडमधील एक चार मजली इमारत आहे. दाटीवाटीच्या परिसरात ही इमारत असून या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार असे एकूण १६ सदनिका आहेत. या निवासी इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका घरात गॅस सिलिंडरचा पाईप फुटल्याने अचानक आग लागली. या सदनिकेखालीच विद्युत मीटर आणि विद्युत वाहिन्या असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत होती. यामुळेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिक घरातील आग शमविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु गॅस सिलिंडरच्या पाईपला लागलेली आग वाढत असल्याचे लक्षात येताच, पठाण यांनी प्रथम घरातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच घरातील महत्त्वाचे साहित्यही सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली होती, त्या घराच्या खालीच विद्युत मीटर आणि केबल्सचे जाळे असल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब ओळखत पठाण यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत थेट या इमारतीत प्रवेश केला आणि वीजप्रवाह खंडित केला. त्यांच्या या कृतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या इमारतीचा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे आग वेगाने पसरू शकली असती. मात्र वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, “हे काम सामाजिक जबाबदारीतून केले आहे. त्यासाठी वेगळे श्रेय घेण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया अशरफ शानू पठाण यांनी दिली.