ठाणे – मुंबईत मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पावसाळ्यातील निष्काळजीपणाचा आणखी एक बळी ठाणे जिल्ह्यात गेला असल्याचे समोर आले आहे. मुंब्रा येथील कौसा परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परिसरातील नागरिकांनी यापूर्वी वारंवार विद्युत सुरक्षेबाबत तक्रारी करूनही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी टोरेंट पॉवर लिमिटेडच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्र्यातील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला (वय १७) असे असून ती कौसा येथील यास्मिन अपार्टमेंट, कादर पॅलेस येथे राहत होती. १ जुलै रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास आलिया इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली असता परिसरात पावसाचे पाणी साचले होते. या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने बिलाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संबंधित इमारतीतील रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा परिसरात व्होल्टेजमधील चढ-उतार, विद्युत प्रवाहाचा धोका आणि विद्युत सुरक्षेतील त्रुटींबाबत टोरेंट पॉवर लिमिटेडकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच १५ जून २०२६ रोजी कंपनीच्या ऑनलाइन तक्रार प्रणालीवरही यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही प्रभावी दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वेळेत आवश्यक कारवाई झाली असती, तर आलियाचा जीव वाचू शकला असता.
या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी टोरेंट पॉवर लिमिटेडच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान, आलियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दुसरीकडे, टोरेंट पॉवर लिमिटेडने या घटनेची दखल घेत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तपास अहवालातील निष्कर्षांनुसार आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
