ठाणे – एसआयआरच्या माध्यमातून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील तब्बल दोन लाख मतदारांची नावे कापण्यात आली असून, विरोधातील प्रबळ नेतृत्व संपविण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये ज्याप्रकारे मतदारांची नावे वगळण्याचे प्रकार झाले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत ‘जो उमेदवार मजबूत असेल, त्याचीच मते कापा आणि त्याला पाडा’, असे धोरण आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते समीर शमीम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हेही उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी एसआयआरच्या माध्यमातून विरोधातील प्रबळ नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, अशी स्थिती कधीच नव्हती. त्यांच्या पक्षाचा पराभव जेवढ्या मतांनी झाला आहे. तेवढीच मते एसआयआरमध्ये कापण्यात आली होती, हे उघडकीस आले आहे.
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने ही नावे चुकून कापली आहेत, असे स्पष्टीकरणही दिले आहे. तमीळनाडूमध्ये स्टॅलिन कसे काय पराभूत होऊ शकतात, स्टॅलिन फक्त १५०० मतांनी हरले. ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना षडयंत्र करून हरविण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांचेच हे षडयंत्र आहे. जो कोण मजबूत उमेदवार असेल, त्या उमेदवाराची एसआयआरच्या माध्यमातून मते कापा आणि त्यांना पाडा, हेच धोरण आखण्यात आले आहे.
त्यामुळे झेन झी म्हणजे ज्यांनी वयाची ३० वर्षे ओलांडलेली नाहीत आणि ३० वर्षांच्या आत आहेत आणि जे तरुण १८ च्या पुढे आहेत, त्यांनी येत्या काही दिवसांत फॉर्म नंबर सहा भरावेत आणि मतदार व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. आपल्याला कोणाचेही भय बाळगण्याचे कारण नाही. पण मत नोंदणी करणे ही आपल्या पक्ष संघटनेची जबाबदारी आहे. संघटनेने जबाबदारीने तरुणांपर्यंत पोहोचून काम केले पाहिजे. निवडणुकीला आता अडीच वर्षे बाकी आहेत, मात्र, निवडणूक लवकरही घेऊ शकतात, कधीही घेऊ शकतात. यांचा काही भरवसा नाही. निवडणूक कधीही येऊ दे, पण आपली तयारी आजपासून सुरू झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
