ठाणे : नीटची परिक्षा देण्याची तयारी करत असलेले किंवा नापास झाल्यानंतही पुन्हा परिक्षेची तयारी करीत असलेले अशा विद्यार्थ्यांसाठी मुंब्य्रातील एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांनी एका शिबीराचे आयोजन केले आहे. आर्थिक कारणामुळे परिक्षेपासून वंचित राहू नये यासाठी विनामुल्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असे असले तरी, पालकांच्या पाठिंबा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असल्यामुळे शिबिरात पालकांना घेऊन आल्यावरच प्रवेश दिला जाईल, अशी अट सहर यांनी ठेवली आहे.
नीटची परिक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी तयारी करत असतात. लाखो रुपयांचे शुल्क आकारून अनेक क्लासेस याबाबत शिक्षण देतात. काही विद्यार्थ्यांची शुल्क भरण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसते. परंतु या विद्यार्थ्यांनाही परिक्षा देण्याची इच्छा असते आणि ते आपल्या परिने तयारी करीत असतात. असे विद्यार्थी मागे राहू नयेत आणि त्यांना परिक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी मुंब्य्रातील एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांनी एका शिबीराचे आयोजन केले आहे. १ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत मुंब्रा येथील चांद नगर भागातील सानिया सेलिब्रेशन हॉलमध्ये हे शिबीर होणार आहे.
या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन सहर शेख यांनी समाजमाध्यमांद्वारे केले आहे. हे शिबीर नीटची परिक्षा देण्याची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी नीट परीक्षा दिली पण उत्तीर्ण होऊ शकले नाहीत आणि आता पुन्हा परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांची उपस्थिती अनिवार्य आहे, कारण विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचा योग्य पाठिंबा आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे विनामुल्य प्रवेश असला तरी, शिबिरात पालकांना घेऊन आल्यावरच प्रवेश दिला जाईल, असे सहर शेख यांनी म्हटले. आर्थिक कारणांमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा व उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या शिबीरामध्ये नीट परीक्षा प्रभावीपणे कशी पास करावी, योग्य अभ्यास पद्धती कोणती असावी, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयातील अडचणी कशा दूर कराव्यात, पेपर कसा सोडवावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी आणि १० ते १२ तास अभ्यास करण्याची क्षमता कशी विकसित करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आपला मोटिवेशनल ड्राइव्ह कसा कायम ठेवावा यावरही विशेष भर दिला जाईल. पालकांसाठी “स्मार्ट पॅरेंटिंग” या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल, ज्यामध्ये मुलांना योग्य प्रकारे कसा सपोर्ट द्यावा, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा आणि अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण कसे तयार करावे याबद्दल माहिती दिली जाईल. हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी फक्त बुक, पेन आणि आधार कार्ड सोबत आणावे, असे सहर शेख यांनी म्हटले आहे.
