Mumbra Muslim Youth Trolley Breakdown Help Ganesh Idol: गेल्या काही वर्षांत धार्मिक वातावरण गढूळ होत असताना मुंब्रा शहरातील तरुणांनी सामाजिक सलोख्याचा संदेश देत समाजकंटकांना एकप्रकारे चपराक दिली. हिंदू-मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्रा शहराने सामाजिक एकता आणि सलोख्याची परंपरा जपली आहे. याचं एकतेचे दर्शन घडले. गणेशमूर्ती घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने निघालेल्या ट्रॉलीचे चाक अचानक तुटल्याने गणेशमूर्तीला धोका निर्माण झाला. त्यावेळी मुंब्ऱ्यातील मुस्लिम तरुणांनी तातडीने धाव घेतली आणि तब्बल चार तास परिश्रम करून गणेशमूर्तीला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांच्या या कृतीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्यात आला.
मुंब्ऱ्यातील शंकर मंदिर परिसरात मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुमारे २० फूट उंचीची गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. ही गणेशमूर्ती भिवंडीतील पद्मानगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने नेण्यात येत होती. रविवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ट्रॉली मुंब्र्यातील दाभोळकर नाका येथे पोहोचली असता अचानक तिचे चाक तुटले. त्यामुळे ट्रॉली कलंडून गणेशमूर्तीला इजा होण्याची शक्यता निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात येताच आरिफ सय्यद, बासीत शेख आणि शाहू यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी परिसरातील अनेक तरुणांना बोलावून घेतले. तरुणांनी ट्रॉलीला आधार देत ती कलंडणार नाही, याची काळजी घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने गणेशमूर्ती सुरक्षितपणे ट्रॉलीवरून खाली उतरविण्यात आली.
दरम्यान, नवीन ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली. नवीन ट्रॉली आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्ती पुन्हा त्यावर चढविण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तरुणांनी पहाटेपर्यंत अथक परिश्रम घेतले. अखेर रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गणेशमूर्ती सुरक्षितपणे भिवंडीच्या दिशेने रवाना करण्यात आली.
विशेष म्हणजे, गणेशमूर्ती सुरक्षितपणे रवाना झाल्यानंतर याच मुस्लिम तरुणांनी गणेशमूर्तीसमोर श्रीफळ वाढवून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. गणेशमूर्तीला कोणतीही इजा होऊ नये यासाठी रात्रभर मदतीला धावून आलेल्या आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख आणि शाहू यांच्यासह मुंब्र्यातील सर्व तरुणांचे मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाने आभार मानले. संकटाच्या प्रसंगी धर्म-पंथाचा विचार न करता एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मुंब्र्यातील तरुणांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण यानिमित्ताने घालून दिले.
