ठाणे : मुंब्रा येथील रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाले आणि रिक्षा चालकांविरोधात ठाणे महापालिका, मुंब्रा पोलीस ठाणे आणि वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. ११ आणि १३ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये शेकडो रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई झाली आहे.
मुंब्रा शहरात मोठ्याप्रमाणात रस्त्याकडेला बेकायदा फेरीवाले उभे राहतात. तसेच काही रिक्षा चालकांकडूनही बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करतात. या प्रकारामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल, प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. तसेच वाहतुक कोंडीचा फटकाही इतर वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. यासंदर्भाच्या अनेक तक्रारी मुंब्रा वाहतुक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ठाणे महापालिका, मुंब्रा पोलीस ठाणे, मुंब्रा वाहतुक शाखेने कारवाई सुरु केली होती.
कौसा कब्रस्तान, मित्तल नगर परिसर, कौसा, एम.गेट, एमएम व्हॅली, शिमल पार्क या परिसरात ११ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ६१ रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. तर महापालिकेने ७० फेरीवाल्यांवर कारवाई केली. १३ नोव्हेंबर या दिवशी त्याच भागात ९१ रिक्षा चालक आणि २५ फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. ही कारवाई सुरु राहणार असल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले.
