ठाणे : दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आफ्रिका खंडातील टांझानिया व नायजेरिया या देशांतील चार नागरिकांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. रशीद सईद व हसन अली (दोघेही टांझानियाचे), तर केव्हीन दोसा व ओबीअली चीडीबेरी (दोघेही नायजेरियाचे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठाणे न्यायालयाने या चौघांनाही ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंब्रा शहरात काही दिवसांपासून अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. मुंब्रा येथील सम्राटनगर परिसरात काही विदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने व तपास पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे २८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून चारही संशयितांना ताब्यात घेतले. उपायुक्त बाळासाहेब पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी ही कारवाई करण्यासाठी पथक नेमले होते. चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण एक कोटी ५० लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त बाळासाहेब पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक वृषाली पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, रामकृष्ण मुणगेकर आणि त्यांच्या पथकाने केली.