ठाणे : पोलिसांना कायद्याचे रक्षक म्हटले जाते. तसेच पोलीस असल्यावर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित असतो. परंतु पोलिसावरच मुंब्रा येथे हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात पोलिसाच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्यात जखमी पोलीस शिपाई सचिन पाटील कार्यरत आहेत. अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका पथक नेमण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दररोज मुंब्रा शहरात ते गस्ती घालतात. सध्या रमझान सुरु असल्याने गर्दीमुळे मुंब्रा शहरात कोंडी होते. २७ फेब्रुवारीला देखील वाहतुक कोंडी झाल्याने सचिन पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह कोंडी सोडवित होते. मुंब्रा वाय जंक्शन परिसरात सचिन पाटील असताना एका दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी आरडाओरड तसेच बेशिस्त वागण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या दिशेने पाहून शिवीगाळ सुरु केली. ‘पुलीस करती क्या है, खाली पैसा खाती है.. बडा पेट लेके घुमती है’ असे म्हणत पुन्हा शिवीगाळ केली.

सचिन पाटील आणि पोलीस हवालदार महाले यांनी आम्ही वाहतुक कोंडी सोडवित असल्याचे त्या तरुणांना सांगितले असता, दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने महाले यांना शिवीगाळ केली. तर दुसऱ्या तरुणाने सचिन पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या तरुणाने सचिन पाटील यांच्या कानाच्या दिशेने हाताच्या ठोशाने मारहाण केली. सचिन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जमावाने महाले आणि इतर जमावाने त्यांना एका बाजूला बसविले. सचिन यांना काहीही ऐकू येत नव्हते. तसेच त्यांना चक्कर येऊ लागली. महाले यांनी त्या दोन्ही तरुणांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी विरुद्ध दिशेने दुचाकी चालवित तेथून पळ काढला.

आणि गुन्हा दाखल…

सचिन यांच्या कानातून काहीवेळाने रक्त निघू लागले. त्यानंतर त्यांना एका रिक्षाने उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांना कानाच्या डाॅक्टरांकडे तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी सचिन पाटील यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन्ही तरुणांविरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.