ठाणे : समाजमाध्यमावरील इन्स्टाग्राम ॲपचा वापर करून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रीकरण प्रसारण करणाऱ्या एका इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. केंद्रीय गृहखात्याच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र व बेपत्ता आणि शोषित बालकांसाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएमईसी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
चार वर्षांच्या कालावधीत संबंधित खात्यावरून अशा प्रकारच्या सामग्रीची देवाणघेवाण व साठवणूक केल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र हे सामाजिक माध्यमांवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर, छायाचित्र व चित्रीकरणावर सातत्याने नजर ठेवते. त्यासाठी बेपत्ता व शोषित बालकांसाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएमईसी) या संस्थेकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे देशभरातील संबंधित पोलीस ठाण्यांना कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले जातात.
अशाच एका सूचनेत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत एका इन्स्टाग्राम खात्यावरून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीची देवाणघेवाण होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर मुंब्रा पोलिसांच्या सायबर कक्षाने प्राप्त कागदपत्रांचे व डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात संबंधित इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून ३० एप्रिल २०२२ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत बाल लैंगिक शोषणाशी संबंधित छायाचित्र व चित्रीकरण प्रसारण तसेच साठवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
ओळख निश्चितीसाठी पडताळणी
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संशयिताने इन्स्टाग्राम खात्यावरील एका प्रोफाइलचा वापर करून आक्षेपार्ह सामग्रीची देवाणघेवाण केली. तपासासाठी संबंधित इन्स्टाग्राम खाते, ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांनी नोंदवली असून, आरोपीची ओळख निश्चित करण्यासाठी डिजिटल पुरावे, आयपी लॉग, खातेविषयक माहिती व इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे.
